ठाणे : कळवा येथे महिलेचा पाठलाग करत इमारतीच्या आत शिरून एका सराईत गुन्हेगाराने महिलेच्या हातातील पर्स हिसकावली. या घटनेप्रकणी पोलिसांनी हरि ठाकूर (३०) याला अटक केली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण प्रसारित झाले आहे. चोरट्याने पर्स खेचल्यानंतर महिला प्रचंड घाबरली होती. हरि याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात आठ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

गेल्याकाही वर्षांमध्ये महिला सुरक्षाचा प्रश्न सर्वत्र ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर चालताना हातातून मोबाईल खेचून नेणे, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, दागिने खेचण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. कळव्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. इमारतीमध्ये शिरून महिलेच्या हातातील पर्स चोरट्याने खेचली. त्यानंतर चोरट्याने पळ काढला होता.

प्रकरण असे आहे की, कळवा येथील पारसिकनगर भागात राहणारी ४३ वर्षीय महिला सोमवारी मनीषानगर येथील एका इमारतीमध्ये घरकामासाठी जात होती. त्यावेळी एक तरुण तिचा पाठलाग करत होता. महिला इमारतीमधील जिन्यावर असतानाच, चोरट्याने त्यांच्या हातातील पर्स खेचली. या घटनेनंतर महिला घाबरली होती. या घटनेचे चित्रीकरण इमारती बाहेरील आणि आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते. या प्रकारानंतर महिलेने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी पोलीस निरीक्षक विठ्ठल नावडे (प्रशासन), अनिल गायकवाड (गुन्हे), साहाय्ययक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे (तपास पथक प्रमुख), साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शिंदे, पोलीस हवालदार वैभव जोशी, महेंद्र शेळके, जगदीश न्हावळदे, महादेव हजारे, स्वप्नील खपाले यांना घटनास्थळवरील इमारतीचे तसेच कळवा भागातील इतर सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यास सांगितले.

तांत्रिक विश्वेषणाच्या आधारे, पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून सराईत गुन्हेगार हरि ठाकूर याला कळवा येथील मफतलाल झोपडपट्टी येथील शांतीनगर भागातून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले कपडे, महिलेची पर्स, जबरी चोरी करुन मिळविलेली ७ हजार ५०० रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात आठ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात आरोपीला अटक करण्यात आल्याचेही पोलीस म्हणाले.