शहापूर तालुक्यातील सापगावजवळील भातसा नदीत दोन दिवसांपूर्वी मृतदेह मिळालेल्या २२ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गुन्हा शहापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
हेदवली येथील महिला खैरे येथे माहेरी गेली होती. एक मे रोजी ती सासरी जाते म्हणून घरातून निघाली, मात्र ती सासरी पोहोचली नसल्याने याबाबत किन्हवली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली. दोन दिवसांपूर्वी तिचा मृतदेह तालुक्यातील सापगावजवळील भातसा नदीत आढळून आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात सोमवारी पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर महिलेवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावरून शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गोरख धसाडे याला अटक करण्यात आली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धसाडे हा या विवाहित महिलेला फसवून शिर्डी येथे घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली व मृतदेह सापगावजवळील भातसा नदीच्या पात्रात टाकून दिला. अशी माहिती पोलिसांनी दिली.

बँकेतून दीड हजार रुपयांची चोरी
ठाणे : कळव्यातील भास्कर नगर भागात राहणारे शिवशंकर विश्राम प्रजापती (३०) सोमवारी भारतीय स्टेट बॅंकेच्या कळवा शाखेत गेले होते. मूळगावी असलेल्या पत्नीच्या खात्यात पैसे भरण्यासाठी प्रजापती रांगेत उभे असनाता दोन व्यक्तींनी हातचलाखीने त्यांच्या हातातील १,६३० रुपये चोरुन पळ काढला. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीत तरुणीवर बलात्कार
ठाणे :  भिवंडी येथील फेणागाव भागात शुक्रवारी २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी अमरजीत फुलचंद गौड याच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडीत मुलीच्या घरात कोणीही नसताना अमरजितने तरुणीच्या घरात प्रवेश करुन तिचे तोंड कपडय़ाने बांधून तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणी अमरजितला भिवंडी पोलीसांनी अटक केली आहे.

रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला
ठाणे : भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या रिक्षाचालकावर चाकूने वार करुन लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना भिवंडीत घडली.
गायत्रीनगर येथे राहणारे कमाल अहमद नियाज अहमद अन्सारी (३९) रविवारी सिद्धेश हॉटेलजवळ गेले होते. तेव्हा पिंटू, पापा सगीर अहमद अन्सारी (२५), सद्दम निजामद्दीन शाह (२२) आणि शादाब उर्फ छेदी निजामउद्दीन शाह (१९) यांच्यात वाद सुरू होता. अन्सारी वाद सोडविण्यासाठी गेले असता पिंटू याने शिवीगाळ करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर चाकूने त्यांच्या डोक्यावर, छातीवर आणि पोटावर वार केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.