ठाणे : साहस आणि फिटनेस या दोन्ही गोष्टींची सांगड घालत यंदाच्या वर्षासाठी विशेष आणि प्रेरणादायी लक्ष्य ठाण्यातील दांपत्याने निश्चित केले आहे. ठाण्यातील सायकलपटू ऋषिकेश सोनार आणि त्यांची पत्नी श्रद्धा सोनार यांनी G2G Ride – India Gate, Delhi to Gateway of India, Mumbai’ ही सुमारे १,४०० किलोमीटरची सायकल फेरी हे दांपत्य ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सहा वाजता दिल्लीतील इंडिया गेट येथून सुरू केली आहे. ही संपूर्ण मोहिम ते स्वतःच्या बळावर (Self-Supported) पूर्ण करणार असून, कोणतेही वाहन त्यांच्या मदतीसाठी नसणार आहे.
आताच्या काळात कामासोबतच आरोग्याला महत्व दिले जाते. शरीराचे आरोग्य तसेच मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी अनेकजण विविध उपक्रम करत असतात. अशातच ठाण्यातील दाम्पत्यांनी सायकल फेरी सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा ते रायगड केलेल्या ऐतिहासिक प्रवासातून प्रेरणा घेत या दाम्पत्याने ही सफर करण्याचे ठरवले आहे. “शिवाजी महाराज शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे त्यांनी अशक्य वाटणारे कार्य साध्य केले. तसंच आम्हालाही ‘फिट रहा, हिट रहा’ या मंत्राने हा प्रवास करायचा आहे,” असे रुशिकेश सोनार यांनी सांगितले.
ऋषिकेश आणि श्रद्धा हे दोघेही यापूर्वी अनेक दीर्घ सायकलिंग मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत ४०० किमी ठाणे ते स्टॅच्यू ऑफ युनिटी (गुजरात) हे अंतर त्यांनी २ ते ४ जून २०२२ मध्ये ३ दिवसात, ६०० किमी ठाणे ते गोवा हे अंतर त्यांनी २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ मध्ये ५ दिवसात , १००० किमी बंगळुरू ते ठाणे हे १६ ते २३ सप्टेंबर २०२४ रोजी ७ दिवस अशा मोहिमा पूर्ण केल्या आहेत. यानंतर आता ते १,४०० किमी दिल्ली ते मुंबई ही सर्वात मोठी आणि आव्हानात्मक मोहिम पूर्ण करण्यास सज्ज आहेत.
कसे आहे दिवसनिहाय नियोजन
या प्रवासात सोनार दांपत्य रोज सुमारे १३५ ते १६० किमी सायकल चालवणार आहे. पहिल्या दिवशी ३१ ऑक्टोबरला दिल्ली – कोटपुतली, राजस्थान असे १५७ किमी अंतर होते. दुसऱ्या दिवशी कोटपुतली – बगरू, राजस्थान असे १३५ किमी अंतर, तिसऱ्या दिवशी बगरू – बिजयनगर, राजस्थान (१५० किमी), चौथ्या दिवशी बिजयनगर – राजसमंद, राजस्थान (१२७ किमी), पाचवा दिवस : राजसमंद – भागला घाट, राजस्थान (१३८ किमी), सहावा दिवस : भागला घाट – लिमबोद्रा, गुजरात (१६१ किमी), सातवा दिवस : लिमबोद्रा – बामनगाम, गुजरात (१५० किमी), आठवा दिवस : बामनगाम – नवसारी, गुजरात (१५५ किमी), नववा दिवस : नवसारी – मनोर, महाराष्ट्र (१४५ किमी), दहावा दिवस : मनोर – गेटवे ऑफ इंडिया, मुंबई (१०० किमी) असे नियोजन असणार आहे.
“ही सायकल सफर केवळ फिटनेससाठी नसून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून उद्दिष्ट साध्य करण्याचा एक प्रयत्न आहे. आम्हाला सर्वांच्या शुभेच्छा आणि नैतिक पाठबळ मिळावे हीच अपेक्षा,” असे ऋषिकेश आणि श्रद्धा सोनार यांनी सांगितले.
