डोंबिवली : लाडकी बहिण योजनेविषयी विरोधक विविध प्रकारच्या दररोज अफवा पसरवत आहेत. समाजात संभ्रम निर्माण करत आहे. पण, लाडक्या बहिणींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. लाडकी बहिण योजना ही कधीही बंद होणार नाही. ती सुरूच राहणार आहे. कारण आमचे सरकार प्रिटिंग मिस्टेक न करणारे आणि दिलेला शब्द पाळणारे डबल इंजिन सरकार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी डोंबिवलीत विविध विकास कामांचे उद्घाटन करताना केले.
सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आयोजित या कार्यक्रमात कचरा वाहतूक संकलन स्वच्छता प्रकल्प, टिटवाळा उद्यान विकास प्रकल्प, कौशल्य विकास केंद्र, खंबाळपाडा क्रीडा संकुलाचे भूमिपूजन, पोलिसांच्या दामिनी पथकाला १६ दुचाकींचे हस्तांतरण, बाधित लाभार्थींना चावी वाटप, परिवहन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्त योजनेचे धनादेश, आरटीओ नवीन इमारतीचे उद्घाटन अशा नऊ प्रकल्पांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले होते. या कार्यक्रमाला भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, आमदार विश्वनाथ भोईर, आयुक्त अभिनव गोयल, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, कचरा व्यवस्थापक प्रकल्प राबविणाऱ्या सुमित एल्को कंपनीचे संचालक मंडळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विकासाला चालना देण्याचे काम राज्यस्तरावरून सुरू आहे. तरीही विरोधक लाडकी बहिण योजनेविषयी अनेक अफवा पसरवत आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये. आमच्या सरकार मधील काम करणारी मंडळी एकाच विचाराची आहेत. या सरकारला डबल इंजिन आहे. पंतप्रधान मोदींची या सरकारला साथ आहे. आम्ही प्रिटिंग मिस्टेक न करता काम करतो. आम्ही दिलेला शब्द पाळतो. त्यामुळे लाडकी बहिण योजना ही सुरूच राहणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले
कल्याण डोंबिवली शहर स्वच्छतेसाठी चेन्नई पॅटर्न राबविला जात आहे. सुमित एल्को कंपनीच्या माध्यमातून ही अद्ययावत यंत्रणा शहरात कार्यान्वित झाली तर कल्याण डोंबिवली शहरे स्वच्छतेच्या बाबतीत चेन्नईपेक्षा प्रथम क्रमांकावर असतील यासाठी प्रयत्न करा. या पालिका हद्दीत काँक्रीटची कामे झाली आहेत. पुढील ५० वर्ष या शहरात खड्डेमुक्त रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करता येणार आहे. ऑपरेश सिंदूर या लष्करी मोहिमेतून भारताने आपली सामरिक ताकद पाकिस्तानचे कंबरडे मोडून जगाला दाखवून दिली आहे. त्याच बरोबर आपली देशभक्ती, राष्ट्रभक्तीची चुणूक दाखवली. आमच्या बहिणींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा आपण सिंदूर मोहिमेतून खात्मा केला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. स्वच्छतेचा पॅटर्न राबविताना त्यामध्ये पालिकेतील सफाई विभागातील कर्मचाऱ्यांना सामावून घ्या. त्यांना वाऱ्यावर सोडू नका असा सल्ला उपमुख्यमंत्र्यांनी पालिकेला दिला.