Thane News : ठाणे : पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते. यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाने कळवा परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्याठिकाणी एक बालक अंगकंपामुळे गंभीर अवस्थेत शिबिरात दाखल झाला. त्याची बालरोग तज्ञ आणि न्यूरो तज्ज्ञांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलविले.
राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. या मदतीसाठी यापूर्वी मंत्रालयात जावे लागत होते. नागरिकांना आपल्याच जिल्ह्यात ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हास्तरावर कक्ष सुरू करण्यात आले आहेत. अशाचप्रकारे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात १ मे २०२५ रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या अध्यक्ष डॉ. प्रियांका यादव या आहेत तर, सदस्य राजेश वारे आणि पूजा माऊसकर-वडेकर हे आहेत.
कळव्यात आरोग्य शिबीर
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, ठाणे यांच्यावतीने २७ जुलै २०२५ रोजी कळव्यातील सहकार विद्यालय येथे भव्य सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि आजारी नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार, मुख्यमंत्री आरोग्य निधीची माहिती आणि मदत पुरविणे हे शिबिराचे उद्दिष्ट होते. या शिबिरात विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवक आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.
दीड हजार नागरिकांनी घेतला लाभ
या शिबिरत ईसीजी (ECG), रक्तदाब, हृदय विकार तपासणी, मोतीबिंदू, चष्म्याची तपासणी, श्रवण तपासणी, घसा तपासणी, महिलांचे आरोग्य, लहान मुलांची तपासणी, पोषण तपासणी, सांधेदुखी, हाड तपासणी, दातांचे आरोग्य आणि स्वच्छता, अॅलर्जी, त्वचेचे विकार, अशा तपासणी आणि होमिओपॅथी पर्यायी औषधे आणि जीवनशैली सल्ला देण्यात आला. काही रुग्णांकरिता CBE (Clinical Breast Examination) हे मॅमोग्राफी व्हॅनच्या सहायाने करण्यात आले. या शिबिरामध्ये १ हजार ५१० नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. अशा शिबिरांमध्ये न्यूरोसर्जन विभाग हा फार महत्त्वाचा ठरतो, कारण मज्जासंस्थेशी संबंधित आजारांची लक्षणे सामान्य लोकांना ओळखता येत नाहीत. त्यामुळे तज्ज्ञांची उपस्थिती आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मोफत मार्गदर्शन आणि उपचार गरजूंसाठी मोठा आधार ठरला.
अंगकंपाने ग्रस्त बालक दाखल
या शिबिरादरम्यान एक बालरुग्ण सतत अविरत अंग कंप यामुळे गंभीर अवस्थेत शिबिरात दाखल झाला. वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात येताच त्वरित उपस्थित बालरोग तज्ञ आणि न्यूरो तज्ज्ञांनी रुग्णाची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर कळवा येथील शासकीय रुग्णालयात तातडीने रुग्णाला उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले. त्यानंतर रुग्णाच्या पालकांना समजावून सांगून सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्राथमिक उपचार अहवाल देण्यात आले, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अध्यक्ष डॉ.प्रियांका यादव यांनी कळविले आहे.