ठाणे : ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात ( Civil Hospital ) थॅलेसेमिया रुग्णांसाठी अस्थिमज्जा प्रत्यार्पण (Bone Marrow Transplant) विभाग सुरु होणार असल्याची घोषणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी केली. राष्ट्रीय स्वसेवक संघ जनकल्याण समिती संचालित कै.वामनराव ओक रक्त केंद्र यांच्यावतीने थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र या महत्वपूर्ण विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याच्या उद्घाटनावेळी डॉ. कैलाश पवार यांनी ही घोषणा केली.
थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार असून यात रक्तातील हीमोग्लोबिन नीट तयार होत नाही. परिणामी शरीरात ऑक्सिजन पुरविण्याचे कार्य कमी होते आणि रुग्णाला सतत रक्ताल्पता जाणवते. थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास अशी या आजाराची लक्षणे दिसून येतात. याच आजारावर ठाण्यातील कै. वामनराव ओक केंद्र यांच्यावतीने आयोजित कार्यशाळा पार पडली. थॅलेसेमिया या आजाराचे निदान, रुग्ण व्यवस्थापन आणि जनजागृती अशा विविध सत्रात तज्ज्ञ डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते सहभाग घेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या उदघाटनच्या वेळी डॉ. कैलाश पवार यांनी कार्यशाळेच्या आवश्यकतेवर भर दिला. शासकीय व्यवस्था, आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था यांनी एकत्र येऊन थॅलेसेमिया बाबत जनजागृती करावी असे मत त्यांनी यावेळी मांडले. यावेळी व्यासपीठावर डॉ. केंद्रे, जनकल्याण समितीचे थॅलेसेमिया प्रकल्प प्रमुख डॉ. आशुतोष काळे, राष्ट्रीय स्वसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र अध्यक्ष अजित मराठे उपस्थित होते. कै.वामनराव ओक रक्त केंद्राचे अध्यक्ष किरण वैद्य उपस्थित होते. काळजी( Care ), उपचार ( Cure ), नियंत्रण ( Curb ) या त्रिसूत्रीवर संपूर्ण राज्यात राष्ट्रीय स्वसेवक संघ जनकल्याण समितीच्या १४ रक्त केंद्रांतर्फे थॅलेसेमियाबाबत जनजागृती अभियान सुरू असल्याची माहिती डॉ. आशुतोष काळे यांनी दिली.
या कार्यशाळेत भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचे ( ICMR ) तज्ज्ञ डॉक्टर, संशोधक यांच्यासह थॅलेसेमियाविषयी जागृती अभियानात सक्रिय असलेल्या सामाजिक संस्था, थॅलेसेमिया रुग्ण आणि त्यांचे पालक-नातेवाईक, रोटरी क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
थॅलेसेमिया म्हणजे काय ?
थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार आहे. यात रक्तातील हीमोग्लोबिन नीट तयार होत नसल्याने शरीरात ऑक्सिजन पुरवठा कार्य कमी होते. यामुळे रुग्णाला सतत रक्ताल्पता जाणवते. थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसतात. थॅलेसेमियाचे दोन प्रकार असून, कमी प्रमाणात असलेल्या प्रकारात रुग्णाला फारसा त्रास होत नाही. परंतु अशा व्यक्तींच्या विवाहातून जन्मलेल्या मुलांना गंभीर प्रकार म्हणजेच थॅलेसेमिया होऊ शकतो. गंभीर प्रकारात रुग्णाला आयुष्यभर रक्त चढवावे लागते आणि त्याचबरोबर अतिरिक्त लोखंड कमी करण्यासाठी औषधोपचार घ्यावे लागतात. काही प्रकरणांत हाडमज्जा प्रत्यारोपण हा उपचार उपयुक्त ठरतो. या आजारापासून बचाव करण्यासाठी लग्नाआधी वाहक तपासणी करणे अत्यंत आवश्यक मानले जाते.