ठाणे – समाजातील तृतीयपंथांना योग्य पद्धतीने उपचार मिळावे यासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार निरंजन डावखरे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांची याबाबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यावेळी आरोग्यमंत्र्यानी कक्ष रचना, निधी मंजुरी आणि आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने तृतीयपंथ नागरिकांच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तृतीयपंथीयांना समाजात वावरताना अनेक समस्यांना समोर जावे लागते. यामध्ये त्यांना प्रामुख्याने उपचारासाठी अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. सामाजिक दडपणामुळे तृतीयपंथी बहुतांशवेळा आपली ओळख लपवून ठेवतात. अशा वेळी त्यांना अनेकदा सामान्य विभागामध्ये उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे उपचारघेते वेळी त्यांना अडचणीचे होते. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा रुग्णालयात तृतीपंथीयांसाठी स्वतंत्र कक्ष असावा यासाठी सर्वच स्तरावरून पाठपुरावा सुरु होता. यासाठी नुकतीच मुंबई येथे एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी बैठकीत आमदार निरंजन डावखरे तसेच सेवा भारतीचे पदाधिकारी यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला. याला प्रतिसाद देत ठाणे जिल्हा रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात बाबत निर्णय घेण्यात आला.
ठाणे जिल्हा रुग्णालयाची नव्याने उभारणी करण्यात येत आहे. सुमारे ९०० खाटांचे हे नवीन रुग्णालय असणार आहे. या रुग्णालायत उपचारांसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात येत आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या हा रुग्णालयामध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे. या बैठकीदरम्यान आरोग्यमंत्री आबिटकर यांनी कक्ष उभारणीला मंजुरी दिली असून यासाठी अतिरिक्त निधीची पूर्तता, कक्ष रचना आणि आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्याचे आरोग्य विभागाला निर्देश दिले आहेत.
तृतीयपंथी रुग्णांना आदरपूर्ण सेवा देण्यासाठी स्वतंत्र कक्षांचे निर्माण अत्यावश्यक आहे. यासाठी पाठपुरावा केला होता. नव्याने उभ्या राहत असलेल्या ठाणे जिल्हा रुग्णालायत हा स्वतंत्र उपचार कक्ष उभारण्यात येणार आहे. याची कार्यवाही सुरु आहे. – डॉ.कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे