Thane News : ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा परिसरातील एन.आर.नगर, गावदेवी मंदिराजवळ असलेल्या संजय म्हात्रे चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, तीन सदनिकांमध्ये अडकलेल्या एकूण दहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिका प्रशासनाने इमारतीमधील ३० सदनिका रिकाम्या केल्या आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा परिसरातील एन.आर.नगर, गावदेवी मंदिराजवळ संजय म्हात्रे चाळ आहे. हि तळ अधिक एक मजली चाळ असून, अंदाजे १५ ते २० वर्षे जुनी ही चाळ असल्याची माहिती समोर आली आहे. रविवार, १४ सप्टेंबर रोजी रात्री १०.२९ वाजताच्या सुमारास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या दुर्घटनेची माहिती आदेश भगत यांनी दिली. यानंतर ठाणे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दलाचे जवान, टोरंट पॉवरचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

गॅलरीचा स्लॅब कोसळल्यानंतर पहिल्या मजल्यावरील तीन सदनिकांमधील एकूण दहा जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने बचावकार्य करत सर्वांना सुखरूप बाहेर काढले. उर्वरित गॅलरी धोकादायक स्थितीत असल्याने पुढील काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. या चाळीत एकूण ४० सदनिका असून त्यापैकी ३० सदनिका तातडीने रिकाम्या करण्यात आल्या आहेत. अंदाजे ३५ ते ४० रहिवाश्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरते त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पालिकेच्या बांधकाम विभागाकडून या इमारतीची पाहणी सुरू असून पुढील कारवाईबाबत लवकरच निर्णय होणार आहे. जुन्या व जर्जर चाळींमधील रहिवाशांनी वेळोवेळी सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. ही घटना जीवितहानी टळल्याने दिलासा देणारी ठरली असली तरी शहरातील जुन्या चाळींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.