ठाणे महापालिका परिवहनच्या ठाणे- डोंबिवली सेवेचा लाभ देसलेपाडा, पडले गाव व कल्याण शीळ रोड परिसरातील गावांना होत आहे. एनएमएमटीच्या सेवेशिवाय अन्य पर्याय नसल्याने आजवर प्रवाशांना अडचण होत होती. टीएमटीच्या सेवेने ही अडचण काहीशी दूर झाली आहे.

टीएमटीच्या या सेवेमुळे शीळ व कल्याण फाटा, पडले गाव, मानपाडा, लोढा आदी परिसरांतील नागरिकांना जादा बसची सुविधा उपलब्ध झाली आहे.

कल्याण डोंबिवली परिसरात घरांचे प्रकल्पही उभे राहत आहेत. या ठिकाणी घर घेणे नागरिक पसंत करत असून येथे दळणवळणाचे साधन नसल्याने अनेकजण घर घेताना विचार करतात. या परिसरातील नागरिकांना रेल्वे स्थानक गाठण्यासाठी एकतर स्वत:चे वाहन हवे अन्यथा नवी मुंबईच्या बस वा रिक्षाशिवाय त्यांना दुसरा पर्याय  उपलब्ध नव्हता. नवी मुंबई परिवहनच्या फेऱ्याही अध्र्या अध्र्या तासाने असल्याने अनेकदा बस चुकली तर रिक्षाचे भरसाट भाडे आकारून रेल्वे स्थानक गाठावे लागत होते, असे प्रवासी सांगतात. ठाणे परिवहनची बस फेरी पूर्वी खिडकाळीपर्यंतच धावायची. त्यामुळे डोंबिवली गाठायचे तर नवी मुंबई बसशिवाय पर्याय नव्हता.

विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर सेवा

डोंबिवलीतून नवी मुंबईला नोकरीनिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. पश्चिमेतील शास्त्रीनगर येथील बसस्थानकात प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. नवी मुंबईबरोबरच डोंबिवलीबाहेरील मानपाडा रोड, कल्याण शीळ फाटा रस्त्याच्या आजूबाजूला वसलेल्या गावांतील नागरिकही प्रवासासाठी याच बस गाडय़ांचा उपयोग करतात. बसची वेळ चुकली तर अर्धा तास बसथांब्यावर ताटकळत उभे राहावे लागत होते.

अनेकदा बस वेळेत उपलब्ध होत नाहीत. बसमध्ये गर्दी असल्यानेही प्रवाशांना चढता येत नाही, मात्र टीएमटीमुळे आम्हाला जादा बस मिळाल्या आहेत.

राकेश मिश्रा, प्रवासी

एनएमएमटीच्या बस गाडय़ांशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. बस चुकल्यास तासभर वाट पाहावी लागायची. टीएमटीमुळे प्रवास सुकर झालाय.

रंजना जोशी, प्रवासी