ठाणे : ठाणे पुर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प’ (सॅटीस ) प्रकल्पामध्ये रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उड्डाण पुलांची उभारणी झाली असून ही मार्गिका जोडणीचे काम करण्यासाठी पालिकेने रेल्वे विभागाच्या आवश्यक परवानग्या नुकत्याच मिळविल्या आहेत. यानंतर मार्गिका जोडणीच्या कामासाठी रेल्वेचे दोन तासांचे १४ मेगाब्लाॅक घ्यावे लागणार आहे. यासंदर्भात पालिका प्रशासन आणि रेल्वे अधिकारी यांच्यात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, लवकरच मेगाब्लॉकच्या तारखा निश्चित होतील, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

साडेसात लाख प्रवासी प्रवास करतात. या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाच्या उभारणीनंतर येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे. ठाणे पुर्व स्थानक परिसरातूनही अनेक नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात. नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रान्स हार्बरचा फलाट हा पुर्व बाजूस आहे. त्यामुळे बहुतेक प्रवासी पुर्व भागातूनच प्रवास करतात. तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा फलाट जवळ असल्यामुळे हे प्रवासी सुद्धा स्थानकाच्या पुर्व भागातून वाहतूक करतात. ठाण्यासह विविध परिवहन उपक्रमांच्या बोरिवली भागात जाणाऱ्या बसगाड्या येथून सुटतात. याशिवाय, खासगी बसगाड्याही येथूनच वाहतूक करतात. यामुळे या स्थानक परिसरातही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पश्चिमेच्या धर्तीवर ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून सुमारे २६० कोटी रुपये खर्चुन स्थानकाच्या पूर्वेला सॅटीस प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे.

पूल जोडणीसाठी रेल्वे मेगाब्लॉकची आवश्यकता

ठाणे पुर्व स्थानक परिसरातील सॅटीस प्रकल्पातील रेल्वे रुळांवरील पूलजोडणीचे काम शिल्लक होते. रेल्वेच्या ओव्हर हेड वायरच्या खांबाची उंची कमी करण्याच्या कामासाठी पालिकेने रेल्वे विभागाकडे काही महिन्यांपुर्वी १ कोटी ९० लाख रुपये जमा केले होते. हे काम रेल्वे विभागाने नुकतेच पुर्ण केले आहे. पुढच्या टप्प्यात ४७ मीटरच्या पुल जोडणीच्या कामासाठी आवश्यक परवानग्या घेण्याचे काम पालिकेने सुरू केले होते. हे काम नुकतेच पुर्ण झाल्यानंतर पालिकेने रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी कामासाठी रेल्वेचे दोन तासांचे १४ मेगाब्लाॅक देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक बैठक झाली असून लवकरच त्यांच्याकडून परवानगी मिळेल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रकल्पास उशीर होण्याची कारणे

तांत्रिक कारणामुळे प्रकल्पाचा आराखड्यात बदल करण्यात आले आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या यामुळे हा प्रकल्पाच्या कामास विलंब झाला. या जागेवरील रेल्वे विभागाची बांधकामे, शौचालये तसेच इतर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत बराच कालावधी लागला. यामुळे स्थानकाच्या पूर्वेला डेक उभारणीचे काम रखडले होते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून हे काम वेगाने सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकल्पाचा आराखडा

या प्रकल्पात तुळजा भवानी मंदिर, पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ता ते कोपरी कन्हैया नगर, एमजेपी कार्यालयापर्यंत असा एकूण २.२४ किमी लांबीचा उन्नत मार्ग असेल. यात १२ मीटर रुंद मार्गिका असतील. स्थानकात वाहतूक व्यवस्थापनासाठी ९ हजार चौरस मीटर डेक उभारणी. डेक उन्नत मार्गाला जोडण्यात येणार असून त्यात ‘स्टेशन बिल्डिंग’चाही समावेश असेल.