ठाणे : वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही. ‘गीदड़-भभकी’ ला भारत घाबरत नाही. त्यामुळे ‘शेर शेर होता है’ आणि त्या वाघाचे नाव आहे, नरेंद्र मोदी हे मी अभिमाने सांगतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले.

ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नुतनीकृत वास्तूचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

पहलगाममध्ये आपल्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे पाप ज्या दहशतवादी पाकिस्तानने केले, त्याला धडा शिकवण्याचे काम नरेंद्र मोदी आणि आपल्या भारतीय लष्कराने केले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचे काम, जे देशवासी यांच्या मनामध्ये होते ते त्यांनी करून दाखवले. आजही त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी सुदर्शन चक्र मिशन सुरू केले आहे.

त्यामुळे देशाची सुरक्षा आणि या देशातील जनता याबद्दल कधीही तडजोड करणार नाही असे ट्रम्पला ठासून सांगणारे नरेंद्र मोदी हे या देशाचे प्रधानमंत्री आहेत. पाकिस्तानी कारवायांच्या विरुद्ध कारवाई करण्याची हिम्मत मोदींनी दाखवली असेही शिंदे म्हणाले.