मीनाक्षी शिंदे, अनिता गौरी प्रबळ दावेदार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचे आव्हान मोडीत काढत एकहाती सत्ता मिळविणाऱ्या शिवसेनेत आता महापौरपदासाठी चुरस रंगली आहे. यंदाचे महापौरपद खुल्या महिला वर्गासाठी राखीव असल्याने नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत विजयी झालेल्या महिला उमेदवारांपैकी कुणाला हे पद मिळणार याविषयी आता राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

या पदासाठी परिषा सरनाईक, नंदिनी विचारे, जयश्री फाटक, उषा भोईर, मीनाक्षी शिंदे आणि अनिता गौरी या ज्येष्ठ महिला नगरसेवकांची नावे आघाडीवर आहेत. यापैकी गौरी यांनी नुकतेच सभागृह नेतेपद भूषविले आहे. नेत्यांच्या घरात झालेल्या उमेदवारी वाटपामुळे शिवसेनेवर चहुबाजूनी टीका झाली होती. असे असताना महापौरपदासाठी निवड करताना पालकमंत्री एकनाथ िशदे कोणता निकष ठरवतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून त्यामध्ये शिवसेनेचे ६७, राष्ट्रवादीचे ३४, भाजपचे २३, काँग्रेसचे ३, एमआयएमचे २ आणि अपक्ष २ असे एकूण १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ६६ नगरसेवकांचे संख्याबळ असणे गरजेचे होते. शिवसेनेने ६७ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले. ठाणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला आहे. त्यामुळे दरवर्षी निवडणुकांनंतर नगरसेवकांची जुळवाजुळव करताना करावी लागणारी कसरत यंदा पालकमंत्री एकनाथ िशदे यांना करावी लागणार नाही.

येत्या ६ मार्चला नवनिर्वाचित नगरसेवकांमधून महापौर निवडला जाणार असून त्यासाठी २ मार्चला इच्छुकांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. या निवडणुकीत बहुमतामुळे शिवसेनेचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाचे महापौरपद खुल्या महिला वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले असून या पदासाठी नवनिर्वाचित महिला नगरसेवकांच्या नावाची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे, ओवळा-माजिवडय़ाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक, आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक, राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले संजय भोईर यांच्या पत्नी उषा भोईर यांच्या नावाची चर्चा शहरात सुरू झाली आहे. याशिवाय, गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येणाऱ्या मीनाक्षी शिंदे आणि अनिता गौरी या दोन ज्येष्ठ नगरसेविका या पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जातात. मागील पाच वर्षांच्या काळात अखेरच्या वर्षी अनिता गौरी यांना सभागृह नेतेपद देण्यात आले होते.

उर्वरितांना मात्र कोणतेच महत्त्वाचे पद मिळाले नव्हते. मीनाक्षी िशदे या अत्यंत आक्रमक अशा नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांनी समिती सभापतीपद भूषविताना कामाचा ठसा उमटविला होता. त्यामुळे िशदे या पदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane elections 017
First published on: 25-02-2017 at 00:01 IST