TMT Bus : ठाणे : मागील आठवड्यात रस्ते खोदाई कामामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने ठाणे महापालिका परिवहन उपक्रम ( टिएमटी) च्या १२३ पैकी ३१ विद्युत बसगाड्यां प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध झाल्या होत्या. अशीच घटना शनिवारी पुन्हा घडली आहे. शुक्रवारी रात्री महावितरणकडून होणाऱ्या वीज पुरवठा तांत्रिक कारणास्तव बंद झाल्याने ठाणे परिवहन उपक्रमाच्या विद्युत बसगाड्यांची चार्जींग सुविधा ठप्प झाली. यामुळे १२३ पैकी जेमतेम १७ बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी आगाराबाहेर पडल्या असून त्याचा फटका नागरिकांना बसला.

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या (टिएमटी) ताफ्यात ४५३ बसगाड्या असून त्यापैकी ३६३ बसगाड्या प्रवासी वाहतूकीसाठी उपलब्ध होत आहे. यामुळे बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पीएम ई बस योजनेतून १०० आणि केंद्र शासनाच्या एनसीएपी योजनेतून १६० अशा २६० विद्युत बसगाड्या वर्षभरात उपलब्ध होतील, असा दावा परिवहन प्रशासनाने अर्थसंकल्पात केला होता. सद्यस्थितीत टिएमटीच्या १२३ विद्युत बसगाड्या आहेत. ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे.

पुणे येथील सेंट्रल इन्स्टीट्युट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) या संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार १ लाख लोकसंख्येस ३० बसगाड्या असणे आवश्यक आहे. यानुसार, शहरात सुमारे ७५० आणि १० राखीव अशा एकूण ८२५ बसगाड्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात, ३६३ बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत असल्याने प्रवाशांच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी असल्याचे चित्र आहे.

प्रवाशांचे हाल झाले

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण १२३ विद्युत बसगाड्या आहेत. या बसगाड्या वातानुकूलीत असून विविध मार्गांवर चालविण्यात येतात. गारेगार आणि आरामदायी प्रवासामुळे प्रवाशांची या बसगाड्यांना सर्वाधिक पसंती देतात. मागील आठवड्यात रस्ते खोदाई कामामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने चार्जिंग सुविधा ठप्प झाली होती. यामुळे चार्जिंग अभावी बसगाड्या आगारात उभ्या होत्या. असेच चित्र शनिवारी दिसून आले. महावितरणकडून तांत्रिक कारणामुळे शुक्रवारी रात्री ११.३० वाजता वीज पुरवठा खंडीत झाला. शनिवार दुपार ३ वाजेनंतर हा वीज पुरवठा सुरळीत झाला. परंतु यामुळे विद्युत बसगाड्यांची चार्जिंग सुविधा ठप्प झाल्याने बस आगारातच उभ्या होत्या.

उत्पन्नावर परिणाम झाला

चार्जिंग अभावी १२३ पैकी जेमतेम १७ बसगाड्या शनिवारी सकाळी प्रवासी सुविधेसाठी आगाराबाहेर पडल्या. त्याचा फटका कामावर निघालेल्या प्रवाशांना बसला. चार्जिंग अभावी बस गाड्या आगारात उभ्या असल्यामुळे परिवहन उपक्रमाचे सुमारे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या वृत्तास टिएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दुजोरा दिला.