Thane News : ठाणे : श्रावण महिन्यात अनेक संस्थांकडून शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अशाचप्रकारे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि शिवसेना यांच्यावतीने ‘श्रावण महोत्सव २०२५’चे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या महोत्सवात महिलांकरीता विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या असून त्यातील विजेत्यांना बक्षिसे ठेवण्यात आली होती. या महोत्सवाला ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी भेट देवून तेथील जेवणाचा अस्वाद घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी काही दिवसांपुर्वी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्याची पक्षात उपनेते पदावर नियुक्ती झाली असून ते आता जिजाऊ संस्था आणि शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. अशाचप्रकारे त्यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि शिवसेना यांच्यावतीने ‘श्रावण महोत्सव २०२५’चे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.
ठाण्यातील संभाजीनगर येथील कोरम मॉलच्या बाजूला असलेल्या स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय हॉल येथे हा महोत्सव पार पडला. या महोत्सवात महिलांकरीता विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या असून त्यात सुपर वुमन किचन पाककला स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, मेकअप स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ गृहउपयोगी वस्तू स्पर्धा अशा स्पर्धांचा समावेश होता. याशिवाय, मोफत आरोग्य शिबीर, मोफत चष्मे वाटप आणि मोफत वहीवाटप असे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. यातील विजेत्यांना बक्षिसे ठेवण्यात आली होती.
महिलांना असेच प्रोत्साहन मिळू दे
या महोत्सवाला ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी भेट देवून पत्रकारांशी संवाद साधला. प्रत्येक महिला जेवण बनवितात पण, त्यात पण आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न पाक कलेत दिसून येत आहे. स्पर्धेसाठी आलेल्या महिलांमध्ये वेगळेप्रकारचे जेवण करण्याचा गुण आहे आणि अशाप्रकारचे जेवण आपल्यालाही करता आले पाहिजे. जिजाऊ संस्थेने हा चांगला उपक्रम राबविला असून त्यात विजेत्यांसाठी भरघोस बक्षिसे ठेवली आहेत. या संस्थेकडून असेच उपक्रम होत राहोत आणि महिलांना असेच प्रोत्साहन मिळू दे, असे मत माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले.
राजकारणात काही खाता आले नाही
जिजाऊ संस्था गेले अनेक वर्षे ठाणे जिल्ह्यात सामाजिक काम करते. या संस्थेने श्रावण महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यात मेकअप कलाकार, मेहंदी, पाक कला, टाकाऊपासून टिकाऊ अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने महिलांसाठी इथे एक व्यासपीठ तयार केला आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत. हेच काम जिजाऊ संस्थेने केले आहे. याठिकाणी जेवणाची मेजवाणी बघायला मिळत आहे. मी आताच मस्करीत म्हटले की, मला राजकारणात काही खाता आले नाही पण, इथे चविष्ट जेवणाचे पदार्थ मात्र चाखयला मिळाले, अशा भावना मिनाक्षी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केल्या.