ठाणे : मुंब्रा येथील गावदेवी डोंंगरावर फेरफटका मारण्यासाठी गेलेली पाच मुले रस्ता भरकटल्याने सुमारे नऊ तास ही मुले डोंगरात अडकली होती. पोलीस आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने या मुलांची सुटका करण्यात पथकाला यश आले आहे. ही सर्व मुले १८ वयोगटातील असून मुंब्रा शहरातील रहिवासी आहेत.

सय्यद अयुब, शोएब खान, अमूर खान, अरहान खान, मुददशीर गुफारे अशी मुलांची नावे आहेत. मुंब्रा येथील अमृतनगर भागातील ही सर्व मुले रहिवासी आहेत. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही मुले मुंब्रा बाह्यवळण लगतच्या गावदेवी डोंगरावर फिरण्यासाठी गेली होती. तेथून ते पुढे आदिवासी पाडा येथे गेले. परंतु सायंकाळी अंधार झाल्याने त्यांना परतीचा मार्ग मिळत नव्हता आणि ते भरकटले.

अंधार झाल्यानंतर मुले घाबरली. त्यांच्याकडील मोबाईलमध्ये रेंज नसल्याने त्यांना कोणालाही संपर्क करता येत नव्हता. त्यांनी मोबाईलच्या मागे असलेली टाॅर्च पेटविल्या. परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला तो उजेड दिसल्यानंतर त्या व्यक्तीने याबाबतची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली होती. पथक तेथे पोहचल्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक देखील बंद झाला. त्यामुळे मुले कोणत्या ठिकाणी अडकली होती. याची माहिती पथकाला मिळत नव्हती.

मुंब्रा पोलीस, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील रहिवाशांच्या मदतीने मुलांचा शोध सुरु केला. त्यावेळी ही मुले पथकाला आढळून आली. पथकाला माहिती मिळाल्यानंतर एक तासात मुलांचा शोध घेतल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

दुपारी ३ वाजता डोंगरावर गेलेल्या या मुलांचा रात्री ११.३० वाजता शोध लागला. त्यामुळे तब्बल ८.३० तास मुले जंगलात होती. यापूर्वी देखील येथील डोंगर भागात अशाचप्रकारे फिरण्यासाठी गेलेली मुले भरकटल्याचे प्रकार उघड झाले होते. ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलात देखील मुले भरकटली होती. त्यामुळे रात्री जंगल किंवा घनदाट डोंगरावर पर्यटनासाठी जाणे टाळावे असे सांगितले जाते. अनेकदा मुले घरी न सांगताच फेरफटका मारण्यासाठी अशा ठिकाणी जात असतात. त्यामुळे अशा घटना घडत असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात येऊरच्या डोंगरात अशाचप्रकारे १० मुले गिर्यारोहणासाठी गेली होती. डोंगरातील मधमाशांनी त्यांना चावा घेतला होता. त्यामुळे या मुलांपैकी काहींची प्रकृती खराब झाली होती.