उल्हासनगर : उल्हासनगर हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे उपनगर आहे. हे शहर केवळ आपल्या व्यापारी प्रगतीमुळेच नव्हे, तर स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या इतिहासाशी जोडलेल्या सामाजिक, राजकीय आणि मानवी संघर्षामुळेही ओळखले जाते. भारत पाकिस्तान फाळणी, त्यानंतर झालेले विस्थापन, त्यात भारतात आलेले आणि येथे स्थायिक झालेले सिंधी बांधव, त्यांचा विस्थापित ते व्यापारी म्हणून झालेला संघर्षमय प्रवास, उल्हासनगर शहराची देशात असलेली स्वस्त बाजारपेठेची ओळख अशा सर्व गोष्टींमुळे उल्हासनगर शहराचा इतिहास जाणून घेणे महत्वाचे ठरते. मुंबईपासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहराला एक नव्हे दोन नव्हे तर तीन रेल्वे स्थानक जोडले आहेत. ८ ऑगस्ट १९४९ रोजी या शहराची स्थापना झाली. आज या उल्हासनगर शहराचा स्थापना दिवस. त्या निमित्ताने या शहराच्या लहानश्या पण अनोख्या इतिहासावर प्रकाश टाकूया.
“To inaugurate the work of constructing this new township Ulhasnagar designed for the displaced person who are beginning life anew…… सर्वे जनाः सुखिनो भवन्तु !” असा संदेश लिहलेल्या कोनशिलेचा सोमवार, दिनांक ८ ऑगस्ट १९४९ रोजी देशाचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांच्या हस्ते अनावरण झाले आणि उल्हासनगर शहराची पायाभरणी सुरू झाली. तेव्हापासून या शहराने मागे वळून पाहिले नाही.
फाळणीपूर्वीचा उल्हासनगर
१९४७ पूर्वी आजच्या उल्हासनगर परिसराला “कॅलियन कॅम्प” अर्थात कल्याण लष्करी छावणी म्हणून (Kalyan Military Transit Camp) ओळखले जात होते. ब्रिटिशकालीन भारताच्या दुसऱ्या महायुद्धातील लष्करी कामांसाठी हे एक महत्त्वाचे सैन्य छावणी क्षेत्र होते. इथे सुमारे दीड हजार एकर परिसरात १ हजारहून अधिक तात्पुरत्या छावण्या (बॅऱेक) होत्या. युद्धकाळात ही जागा सैनिकांच्या तात्पुरत्या मुक्कामासाठी वापरली जात होती आणि युद्धानंतर काही काळ ही छावणी ओस पडली. या भागात फारशी नागरी वस्ती नव्हती. काही आदिवासी जमाती, कोळी समाज, शेतकरी कुटुंबं यांचा मुख्य वावर या भागात होता. बहुतांश जमिन शेतीसाठी वापरली जात होती.
शहराची स्थापना
भारत-पाकिस्तान फाळणीनंतर सिंध प्रांतातून लाखो सिंधी हिंदू निर्वासित झाले. त्यांच्यासाठी भारत सरकारने या मोकळ्या लष्करी छावण्या निवासासाठी खुल्या केल्या. या निवडलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे कॅम्प एरिया – जो आजचा उल्हासनगर आहे. १९४७ ते १९४९ या काळात जवळपास १ लाखांहून अधिक सिंधी निर्वासित या भागात स्थलांतरित झाले. १९४९ मध्ये भारत सरकारने या वसाहतीस नागरी ओळख दिली आणि ८ ऑगस्ट १९४९ रोजी उल्हासनगर शहराची स्थापना झाली झाली. सुरुवातीला सिंधी समाज अत्यंत हालअपेष्टांत जगत होता. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांचाही अभाव होता. मात्र या समाजाकडे उद्योजकतेची प्रेरणा होती. हातगाडीवर व्यापार सुरू करण्याची तयारी आणि परस्पर सहकार्याची भावना यातून त्यांनी या शहराला बाजारपेठेची ओळख देण्यास सुरूवात केली. त्यांनी कपड्यांच्या गाड्या, छोटे स्टॉल्स आणि हातगाड्यांवर व्यापार सुरू केला. यातून पुढे उल्हासनगरचे तयार कपड्यांचा बाजार उदयास आला. हा बाजार आजही प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, १९६०-७० च्या दशकात उल्हासनगरमधील कापड बाजार महाराष्ट्रभर व्यापारी लोकांकरिता घाऊक खरेदीचे केंद्र बनले.
प्रसिद्ध बाजारपेठ
आजही देशाच्या कानाकोपऱ्यात विविध बाजारपेठांमध्ये उल्हासनगरातून घाऊक माल जातो. गजानन मार्केट हा किरकोळ विक्रीसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. कपड्यांशिवाय इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी, प्लास्टिक, फर्निचर या उद्योगांनीही शहराला व्यापारी वैभव दिले. आज शहरात अनेक जागतिक ब्रॅंडची दुकाने आहेत. मात्र शहराने स्वतःचे काही ब्रॅंड तयार केले आहेत. ते नामांकीत ब्रंँडच्या दर्जाचे आहेत. पूर्वी शहर हे अस्सल वस्तूंची नक्कल करण्यासाठी प्रसिद्ध होते. मात्र आज शहरात अनेक दर्जेदार वस्तूंचे उत्पादन होते. गोरगरिब, मध्यमवर्गीय नागरिकाला परवडणाऱ्या दरात कापड, इलेक्ट्रीक वस्तू, चारचाकी, दुचाकी, प्लास्टिक वस्तू देणारे हे शहर आहे. जीन्स उद्योगातही शहराने मोठी आघाडी घेतलेली आहे.
धार्मिकतेला मानवतेची जोड
उल्हासनगर शहर हे एक धार्मिक आणि मानवता जपणारे शहर म्हणूनही ओळखले जाते. झुलेलाल मंदिर, विविध दरबार, मंदिरे, सत्संग येथे चालतात. धार्मिक केंद्र मानवता केंद्र म्हणूनही पुढे आली आहेत. आज शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर आहे. अशा स्थितीती एखादी इमारत कोसळल्यास त्या बेघरांना दरबारांमध्ये आश्रय दिला जातो. फक्त आश्रय नाही तर त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्नही हे दरबार सोडवतात. राष्ट्रीय आपत्ती, नैसर्गिक आपत्तीतही सिंधी बांधव मदतीला धावून गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. २००५ च्या पुरात याच सिंधी बांधवांनी आणि शहराने अनेक शहरे, गावे यांना मदतीचा हात दिला. बाजारपेठांमध्ये त्या काळात पूरग्रस्तांना सुट देणारे हे देशातले पहिले शहर असावे. सिंधी बांधवांसोबत उल्हासनगर शहरात मराठी आणि पंजाबी, मुस्लिम बांधवही मोठ्या संख्येने राहतात. उल्हासनगर एक छोटा भारत म्हणूनही ओळखला जातो.
नाट्य, कला क्षेत्र
व्यापारासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही उल्हासनगर शहराने आपली नवी ओळख तयार केली आहे. आज उल्हासनगर अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. त्यातून उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते. चांदीबाई हिंमतमल मनसुखानी यांसारख्या संस्थांमध्ये प्रवेशासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. शहरात औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शासकीय मध्यवर्ती रूग्णालयेही आहेत. शहराने आपली सिंधी संस्कृती जपली आहे. सिंधी समाजात संगीत, नाट्य व कविता क्षेत्रात मोठा सहभाग आहे. शहरात सिंधी भाषेतील चित्रपट, गाणी तयार होतात. सिंधी भाषा आजही बोलली जाते.
राजकारण
उल्हासनगर शहराच्या स्वभाववैशिष्ट्यांप्रमाणे शहराचे राजकारणही देशात वेगळे आहे. राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष शहरात अस्तित्वात आहेत. एकेकाळी हे शहर राजकीय गुन्हेगारीसाठीही ओळखले गेले. शहरात एकेकाळी गुन्हेगारी पर्व देशात गाजले. टाडासारख्या कठोर कायद्यांचा वापर करत येथील राजकीय व्यक्तीमत्वांना बेड्या ठोकल्या गेल्या होत्या. सध्या शहर राजकीयदृष्टी स्थीर आणि शांत आहे.
उल्हासनगरचा प्रवास हा केवळ भूगोलाचा नाही, तर इतिहास, संघर्ष, नवउद्यमशक्ती आणि सामाजिक जिद्दीचा आहे. विस्थापनाच्या वेदनेतून उदयास आलेले हे शहर आज घाऊक व्यापारी केंद्र, उद्योजकता आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक बनले आहे. सिंधी समाजाने केवळ नव्या शहरात आपली ओळख निर्माण केली नाही, तर एका ओसाड लष्करी छावणीतून एक वैभवशाली, आत्मनिर्भर आणि ऐतिहासिक शहर उभे केले आहे. हीच उल्हासनगरची खरी ओळख आहे.