ठाणे : राज्यभरातील महाविद्यालयीन विश्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी, पाच दशकांची समृद्ध परंपरा असलेली ठाणे येथील कै. नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धा यंदा शनिवार, २७ सप्टेंबर आणि रविवार, २८ सप्टेंबर या काळात होणार आहे. श्री समर्थ सेवक मंडळ या संस्थेतर्फे नी. गो. पंडितराव या बहुआयामी शिक्षकाच्या स्मरणार्थ आयोजित केल्या जाणाऱ्या या वक्तृत्व स्पर्धेचे यंदाचे ५७ वे वर्ष आहे. स्पर्धा कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालय अशा दोन गटात होणार असून विजेत्यांसाठी एकूण २४ हजार रुपयांची पारितोषिके आहेत.

ठाणे येथील श्री समर्थ सेवक मंडळ या संस्थेतर्फे कै. नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेचे यंदाचे ५७ वे वर्ष आहे. ही स्पर्धा नियोजित विषय (१० मिनिटे) आणि आयत्या वेळचा विषय (०३ मिनिटे) अशा दोन भागात होते. पदवी गटासाठी नियोजित वक्तृत्वाकरता, सोशल मीडिया- अभिव्यक्ती आणि उत्पन्न यांची अनोखी संधी, त्रिभाषा सूत्री – गरज किती, राजकारण किती?, ट्रम्प यांची चाल –भारतापुढील आपत्ती की प्रगतीची सुवर्णसंधी?, पन्नाशी – आणीबाणीची आणि ‘शोले’ची, संत ज्ञानेश्वर –साडेसातशे वर्षांचा समृद्ध वारसा हे विषय आहेत. तर, कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी महाराष्ट्राचे ऐतिहासिक ऐश्वर्य-सह्याद्रीतील गडकिल्ले, सायबर फसवणूक-एक नवीन भस्मासूर, लक्ष्य अनंतापलिकडले – भारताची अंतराळ झेप, माझ्या नजरेतील समृद्धीचा महामार्ग, टेस्ट क्रिकेटचा थरार असे विषय आहेत.

स्पर्धेतील बक्षिसे

दोन्ही गटांसाठी स्वतंत्र पारितोषिके आहेत. प्रथम क्रमांकास ६००० रुपये, द्वितीय क्रमांकास ३००० रुपये, तृतीय क्रमांकास २००० रुपये तर उत्तेजनार्थ १००० रुपये अशी पारितोषिके आहेत. प्रत्येक गटात एका महाविद्यालयास पाच विद्यार्थी पाठवता येतील. दोन्ही प्रकारच्या वक्तृत्वात भाग घेणाऱ्या स्पर्धकांचाच पारितोषिकांसाठी विचार केला जाईल. शिवदौलत सभागृह, श्री हनुमान व्यायामशाळा, गडकरी रंगायतन समोर, ठाणे येथे ही स्पर्धा शनिवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होईल. तर पारितोषिक वितरण समांरभ रविवार, २८ सप्टेंबर रोजी दु. ४.०० वाजता होईल. ठाणे आणि मुंबईबाहेरच्या स्पर्धकांना विनामूल्य निवासव्यवस्था आणि एक वेळचा प्रवास खर्च देण्यात येईल, अशी माहिती स्पर्धा समितीचे चिटणीस डॉ. चैतन्य साठे यांनी दिली. स्पर्धेविषयी अधिक माहिती व अर्जासाठी श्री समर्थ सेवक मंडळ (९९८७९०६२०६ किंवा ९८२१५७२४२७, ssmthane@gmail.com ) येथे संपर्क साधावा.असे आवाहन स्पर्धा समितीने केले आहे.