कल्याण – टिटवाळा अ प्रभाग हद्दीत अटाळी भागात भूमाफियांनी गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत एका अडगळीच्या जागेवर बेकायदा इमारत उभारणीचे काम जोरात सुरू केले होते. या इमारतीचा पाया तयार करून इमारतीचे मजले उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. या बेकायदा इमारतीची माहिती मिळताच, अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी तोडकाम, गॅस कटरच्या साहाय्याने या निर्माणाधिन इमारतीचा पाया आणि पहिल्या माळ्याचे बांधकाम चार तासाच्या अवधीत जमीनदोस्त केले.
या बेकायदा बांधकामांवर कारवाई होऊ नये म्हणून काही मंडळी विविध माध्यमातून साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्यावर दबाव आणत होती. अशाप्रकारे आपण मोबाईल चालू ठेवला तर अटाळीतील हे बेकायदा बांधकाम आपण तोडू शकणार नाहीत. त्यामुळे पाटील यांनी इमारत भुईसपाट करताना आपला मोबाईल फोन कारवाईच्या काळात चार ते पाच तास बंद करून ठेवला. आणि स्वता कारवाईच्या ठिकाणी उपस्थित राहून ही बेकायदा इमारत भुईसपाट केली. बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याची अ प्रभागाची मोहीम भरपावसात सुरू आहे. त्याच बरोबर आता एक बेकायदा इमारतही बुधवारी जमीनदोस्त करण्यात आली.
अटाळी भागातील अडगळीच्या जागेत एक बेकायदा इमारत सुरू असल्याची गुप्त माहिती साहाय्यक आयुक्त पाटील यांना मिळाली होती. पाटील यांनी बीट मुकादम, अधीक्षक यांच्यासह प्रत्यक्ष जागेवरून जाऊन पाहणी केली. त्यावेळी अटाळीत इमारत उभारणीचे काम जोरात सुरू असल्याचे समजले. हे बेकायदा बांधकाम दिवसा कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून चोरीचा वीज प्रवाह घेऊन रात्रीच्या वेळेत हे बांधकाम केले जाते, अशीही माहिती स्थानिकांकडून पालिका अधिकाऱ्यांना मिळाली.
या इमारतीचा पाया आणि पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्याची भूमाफियांची घाई सुरू असतानाच, हे बेकायदा बांधकाम तोडण्याचे नियोजन मंगळवारी साहाय्यक आयुक्त पाटील यांनी केले. इमारत बांधकामाच्या ठिकाणी जेसीबी, कोणतेही वाहन जाऊ शकत नव्हते. त्यामुळे गॅस कटर यंत्र, घण आणि पहार या यंत्रणेच्या माध्यमातून चार ते पाच तासाच्या अवधीत तोडकाम पथकाने ही बेकायदा इमारत जमीनदोस्त केली. इमारत उभारणीसाठी आणलेले सिमेंट, ग्रीट, इतर बांधकाम साहित्य नष्ट करण्यात आले. बेकायदा इमारत कोण उभारत होते. याची माहिती स्थानिकांना विचारण्याचा प्रयत्न पालिका अधिकाऱ्यांनी केला. कोणीही याविषयी माहिती दिली नाही.
ही बेकायदा इमारत भुईसपाट केल्यानंतर साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी आपला कारवाई चालू करताना बंद केलेला मोबाईल पुन्हा सुरू केला. तेव्हा त्यांना मोबाईलवर कारवाई रोखण्यासाठी विविध माध्यमातून सुमारे ५० हून अधिक फोन आले होते, असे मिस काॅलच्या माध्यमातून समजले. मागील दहा महिन्यांपासून अ प्रभाग हद्दीत नियमित बेकायदा बांधकामांच्या विरूध्द आक्रमक कारवाई सुरू आहे. त्यामुळे भूमाफियांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. ही बेकायदा इमारत पुन्हा उभारण्याचा प्रयत्न भूमाफियांनी केला तर त्यांच्या विरूध्द एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा साहाय्यक आयुक्त पाटील यांनी दिला आहे.