कैद्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशासनाचा प्रस्ताव
ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमार्फत पेट्रोल पंप आणि धुलाई केंद्र चालविण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला असून त्यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच राज्याच्या गृहविभागाकडे पाठविण्यात येणार आहे. शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर नवे आयुष्य जगताना कैद्यांना पेट्रोल पंप आणि धुलाई केंद्रामधील कामाच्या कौशल्याच्या आधारे रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, असा या प्रस्तावामागचा उद्देश आहे. याशिवाय, कारागृहात पेट्रोल पंप आणि धुलाई केंद्र सुरू केले तर त्यातून शासनाला महसूल मिळेल, असा दावा कारागृह प्रशासनाकडून करण्यात आला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला खेटूनच असलेल्या ठाणे मध्यवर्ती कारागृह राज्यातील महत्त्वाच्या कारागृहांपैकी एक आहे. या कारागृहामध्ये ११०० कैदी ठेवण्याची क्षमता असली तरी प्रत्यक्षात इथे ३२०० कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचा आकडा जेमतेम दोनशे इतकाच आहे. उर्वरित कच्चे कैदी आहेत. कारागृहातील कैद्यांसाठी येथे सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग, बेकरी आणि फरसाण विभाग चालविण्यात येतात. या विभागांमध्ये शिक्षा भोगत असलेले कैदी काम करतात. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे कारागृहाबाहेरील मोकळ्या जागेत शेती सुरूकरण्यात आली असून खुल्या कारागृहाच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील विविध जिल्ह्य़ांतील २५ कैद्यांमार्फत येथील शेतीमध्ये भाजीपाल्याचे मळे फुलविले जात आहेत. त्यापाठोपाठ आता कारागृहाबाहेरील मोकळ्या जागेत पेट्रोल पंप आणि धुलाई केंद्र चालविण्याचा विचार कारागृह प्रशासनाने सुरू केला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव कारागृह प्रशासनाकडून तयार करण्याचे काम सुरू असून तो लवकरच राज्याच्या गृहविभागाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे कारागृहाबाहेरील मोकळ्या जागेत खुले कारागृह सुरू करण्यात आले असून त्या माध्यमातून या ठिकाणी शेती करण्यात येते. त्याच धर्तीवर या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्याचा प्रस्ताव आठ महिन्यांपूर्वी राज्याच्या गृह विभागाकडे पाठविला होता. या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्यामुळे पेट्रोल पंपाचा प्रस्ताव पुन्हा पाठविण्यात येणार आहे. त्यासोबतच वाहन धुलाई केंद्रही या ठिकाणी सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. पेट्रोल पंप आणि वाहन धुलाई केंद्रासाठी ठाणे कारागृहाबाहेरील मोकळी जागा किंवा साकेत येथील कारागृहाची जागा असे दोन पर्याय सुचविण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे कैद्यांना पेट्रोल पंप आणि धुलाई केंद्रातील कामाचे कौशल्य प्राप्त होईल आणि त्याचे त्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. त्यामुळे शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर कैद्यांना या कामाच्या कौशल्यातून रोजगाराची संधी होईल, असा या प्रस्तावामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खुले कारागृह म्हणजे काय?
विविध गुन्ह्य़ांमध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची कारागृहातील वर्तवणूक पाहण्यासाठी कारागृहात एक समिती असते. या समितीमार्फत चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांची खुल्या कारागृहातील कामासाठी निवड केली जाते. यामध्ये शिक्षेचा कालावधी संपत आलेल्या बहुतांश कैद्यांचा समावेश असतो. त्यामुळे या कारागृहातून त्यांची पळून जाण्याची शक्यताही कमी असते.