ठाणे : ग्राहकांची वजनात फसवणूक होत असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले. याचीच दखल घेत ग्राहकांना त्यांच्या तक्रारी थेट विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडता याव्यात, यासाठी जिल्हा वैधमापन विभागाकडून ‘जनता दरबार’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी हा जनता दरबार पार पडला. यावेळी नागरिकांकडून विविध तक्रारी मांडण्यात आल्या. मात्र यावेळी एका ग्राहकांकडूनन सीएनजी पंपचालकांकडून योग्य रित्या गॅस भरणा होत आहे का नाही यासाठी पेट्रोल पंपाप्रमाणे सीएनजी पंपावर मोजमापकच नसल्याची महत्वाची तक्रार मांडली आहे. तर शासनाकडून देखील याबाबत कोणतीही स्पष्ट नियमावली नसल्याने ही तक्रार जिल्हा प्रशासनाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.

वैधमापन व वजन याबाबत ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने विविध कायदे व नियम लागू केले आहेत. वैध नियमन २००९ आणि त्याअंतर्गत नियमांनुसार, व्यापारी तसेच औद्योगिक आस्थापनांकडे वापरात असलेली वजने, मापे यांची वैधमापनशास्त्र विभागाकडून तपासणी करण्यात येते. मात्र, अजूनही अनेक व्यावसायिक ग्राहकांची अनभिज्ञता, गोंधळाचा फायदा घेत वजन व मापातफसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारांवर निर्बंध आणण्यासाठी ग्राहकांनी पुढे येऊन तक्रारी दाखल करणे गरजेचे आहे. ग्राहकांना त्यांच्या तक्रारी थेट विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडता याव्यात, यासाठी जिल्हा वैधमापन विभागाकडून ‘जनता दरबार’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी हा जनता दरबार भरविण्याचे नियोजन असून यानुसार मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात हा उपक्रम पार पडला. यावेळी ग्राहकांनी विविध तक्रारी मांडल्या.

मुंब्रा येथे काही ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांकडून वजनात घोळ घालत असल्याची तक्रार केली. तर याच पद्धतीने माजीवाडा येथील काही भंगार व्यापाऱ्यांकडून मुद्रांकन न झालेले वजनकाटे वापरत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीबाबत योग्य ती दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा वैधमापन शास्त्र विभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

वैधमापन नियमन अंतर्गत प्रत्येक दुकानात, सोनारांकडे तसेच पेट्रोल पंप यांसारख्या ठिकाणी वजनकाटे ठेवण्यात येतात. इ – वजनकाट्यांबाबत ग्राहकांना संशय असल्यास ग्राहक दुकानदाराकडून खरेदी केलेल्या वस्तूचे प्रत्यक्ष वजन करू शकतो. यामुळे एकूण मालाच्या सुमारे १० टक्के वजन मोजता येईल असे वजन असणे अनिवार्य आहे. तर पेट्रोल पंपावर देखील प्रति लिटर पेट्रोल मोजता येईल असे मापक उपलब्ध असते. मात्र हा प्रकार सीएनजी पंपावर प्रामुख्याने दिसून येत नाही. तर सीएनजीचे देखील मोजमापक त्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र असे असले तरी काही मोजक्याच सीएनजी पंपावर ही मापके ठेवण्यात आलेली असता. याच बाबतची तक्रार नुकत्याच पार पडलेल्या जनता दरबार एका सजग ग्राहकाने मांडली आहे. तर विशेष म्हणजे प्रत्येक सीएनजी पंपावर मोजमापक असावे की नसावे याबाबत शासनाकडून नियमावली नसल्याने हा प्रकार जिल्हा प्रशासनाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

जिल्हा वैधमापन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या तक्रारींबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले असून याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. तर विभागाच्या कार्यक्षेत्रात नसलेल्या तक्रारींबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल देण्यात आला आहे. राम राठोड, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र विभाग, ठाणे