jitendra awhad, Thane news ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात लागलेल्या एका बॅनरमुळे ठाणे शहरासह समाजमाध्यमावर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या बॅनरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांचा एकत्रित फोटो झळकताना दिसतो आहे. या बॅनरमुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

राष्ट्रावादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) नेते जिंतेद्र आव्हाड यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरासह इतर शहरातील कार्यकर्त्यांकडून बॅनर लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. यामध्ये मुंब्रा ब्लॉक कार्याध्यक्ष प्रविण पवार यांच्या वतीने लावण्यात आलेला बॅनर चांगलाच चर्चेत आला आहे. या बॅनरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar), सुप्रिया सुळे (supriya sule), काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो पाहायला मिळत आहे. राजकारणात अनेकदा टोकाचे मतभेद असलेल्या नेत्यांचा एकत्रित फोटो एका पक्षाच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त बॅनरवर झळकतो, ही बाब नागरिकांना आश्चर्यचकित करणारी ठरत आहे. त्यामुळे या बॅनरची ठाणे शहरासह समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली आहे.

हिंदी सक्तीचा शासन निर्णय सरकारने रद्द केल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा एकत्र वरळीत विजयी मेळावा पार पडला होता. तब्बल १८ वर्षानंतर विजयी मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकाच व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेने नवे वळण घेतले होते. या विजयी मेळाव्यात मनसे आणि शिवसेना (ठाकरे) गटाच्या नेत्यांसह व्यासपीठावर जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) आणि सुप्रिया सुळे तसेच इतर पक्षाचे नेतेही एकत्र दिसून आले.

त्यामुळे आगामी निवडणूका हे सर्व पक्ष एकत्रित लढणार का अशा चर्चा देखील सर्वसामान्यांमधून होत होत्या. तर, राजकीय वर्तूळात देखील विविध चर्चा रंगल्या होत्या. त्यात, आता पुन्हा जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते राहुल गांधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो झळकला आहे. या फोटोमुळे आता पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.