ठाणे : कोलशेत येथे एका १७ वर्षीय कबड्डीपटूची तिच्या प्रशिक्षकाने गळा आवळून आणि कात्रीने गळ्याभोवती भोसकवून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोमवारी कापूरबवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव (२३) असे प्रशिक्षकाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. गणेशचे मुलीसोबत प्रेमप्रकरण होते. ती इतर कोणाशी तरी बोलते असा संशय आल्याने त्याने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.

कोलशेत येथील एका चाळीमध्ये १७ वर्षीय मुलगी तिच्या आई आणि भावासोबत भाड्याच्या घरामध्ये वास्तव्यास होती. २४ मे या दिवशी तिच्या घरातून अचानक दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती घर मालकाला दिली. घर मालकाने दरवाजा उघडला असता, घरामध्ये १७ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. घरामध्ये तिची आई आणि भाऊ नव्हते. घटनेची माहिती कापूरबावडी पोलिसांना मिळाल्यानंतर याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. तिचा मृतदेह विच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात नेण्यात आला. विच्छेदन अहवाल २५ मे या दिवशी सायंकाळी आला. त्यामध्ये तिचा मृत्यू हा गळा दाबल्याने आणि गळ्या भोवती जखमा झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कापूरबावडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तिच्या आई, भाऊ आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली. त्यावेळी तिची ओळख कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव याच्यासोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गणेश याला नवी मुंबईतील घणसोली येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने संशयातून तिची हत्या केल्याची कबूली दिली. सोमवारी याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली.

हेही वाचा – साडेचार यलाख रुपयांना बाळाची विक्री, तृतीयपंथीयांसह सहा जणांना अटक, आरोपींमध्ये मुलाच्या आई-वडिलांचाही समावेश

हेही वाचा – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत मुलीला कबड्डी खेळण्याची आवड होती. तिने गणेश याच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. यातून त्यांची मैत्री झाली होती. गणेश तिच्यावर प्रेम करत होता. २३ मे या दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुलगी घरामध्ये एकटी असताना गणेश तिच्या घरी आला. ती इतर कोणाशी तरी मोबाईलवर बोलत असते असा संशय गणेश याला होता. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून त्याने तिचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळला. त्यानंतर तिच्या गळ्या भोवती कात्रीने जखमा केल्या. हत्या झाल्यानंतर गणेशने बाहेरून दरवाजा ओढून पलायन केले. दुसऱ्या दिवशी घरातून दुर्गंधी सुटल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.