ठाणे : ठाण्यातील भाजपचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक संजय वाघुले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते अशा एकूण ३६ जणांविरोधात काही दिवसांपूर्वीच नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी रात्री शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपचे माजी खासदार किरीट किरीट सोमैया यांच्यासह भाजप, शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. त्यानंतर हे प्रकरण अन्य पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचे आश्वासन पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिले.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एक संस्था होती. या संस्थेमध्ये संजय वाघुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह तक्रारदार डॉक्टर यांना डांबून ठेवल्याचा आरोप आहे. नौपाडा पोलीस त्यांना घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी त्यांनी तक्रार दिल्यानंतर संजय वाघुले यांच्यासह ३६ जणांवर गुन्हा दाखल आहे. यामध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक आणि विद्यार्थ्यांचाही सामावेश आहे. तर संबंधित डॉक्टर विरोधातही फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. सत्ताधारी भाजपच्या माजी शहराध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्याने याप्रकरणाची चर्चा ठाण्यात रंगली होती.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेऊन भाजपाचे माजी खासदार किरीट किरीट सोमैया आणि खासदार नरेश म्हस्के यांनी गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नौपाडा पोलीस ठाण्याला भेट देऊन ठिय्या धरला. तसेच या प्रकरणाचा पोलिसांना जाब विचारला.अवघ्या १७ ते १८ वर्षांच्या मुलाविरोधात थेट गंभीर कलमांचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, साहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे यांच्याकडे गुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या भूमिकेबाबतही सवाल केला.
अखेर या प्रकरणाचा गुन्हा नौपाडा पोलिस ठाण्यातून इतर पोलिस ठाण्यात वर्ग करण्याचे आश्वासन उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिले. त्याचबरोबर नौपाडा पोलिसांबद्दल विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या उपायुक्त स्तरावर तक्रारी ऐकून जबाब नोंदविला जाईल. त्यानंतर महिनाभरात योग्य अहवाल करून कारवाई करण्याचे आश्वासन उपायुक्त बुरसे यांनी दिले. त्याचबरोबर या प्रकरणी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीबाबत कायदेशीर बाबी तपासून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासनही देण्यात आले.
ठाण्यात अनेक अशा बनावट शैक्षणिक संस्था आहेत. विद्यार्थी न्याय मागण्यासाठी संस्थेत जाब विचारण्यासाठी गेले होते. परंतु विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. संजय वाघुले यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आम्ही वाघुले आणि विद्यार्थ्यांसोबत आहोत. – नरेश म्हस्के, खासदार, ठाणे लोकसभा.