लोकमान्य नगर येथील तरण तलावाचे नामकरण होऊन अडीच वर्ष उलटले तरी तरण तलाव बंद ठेवण्यात आला असून या मुद्द्यावरून मनसेकडून टिका होताच महापालिकेच्या क्रिडा विभागाने हा तलाव अभिव्यक्ती स्वारस देकार या पध्दतीने खाजगी संस्थेला देण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. यामुळे येत्या २ ते ३ महिन्यांत हा तरण तलाव सुरू होण्याची चिन्हे असून या तलावाचा फायदा परिसरातील नागरिकांना आणि जलतरणपटूंना होणार आहे.

लोकमान्यनगर भागात अडीच वर्षांपुर्वी तरण तलाव बांधण्यात आला असून आकृती विकासकाने हा तरण तलाव बांधून पालिकेच्या ताब्यात दिला आहे. त्याचे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत उद्घाटन करण्यात आले. स्व. रामचंद्र ठाकूर तरण तलाव असे नामकरण करण्यात आले आहे. या तरण तलावाच्या संचलनासाठी पालिकेने निविदा काढून संस्था निश्चित केलेली नव्हती. तरीही पाचशे रुपये घेऊन तरण तलावात सरावासाठी प्रवेश दिला जात होता. तलावाचे नामकरण करून अडीच वर्ष लोटले तरीही हा तरण तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही.

या संदर्भात मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना निवेदन दिले होते. त्यावेळी तरण तलाव दोन महिन्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. महापालिकेच्या क्रिडा विभागाने अभिव्यक्ती स्वारस देकार या पध्दतीने हा तलाव खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला असून हा तलाव पाच वर्षांकरीता संस्थेला चालविण्यास देण्यात येणार आहे. खाजगी संस्था सर्व प्रक्रिया पार पाडून २ ते ३ महिन्यांत तरण तलाव सुरू करेल. तरण तलाव विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही तसेच निगा देखभालीकरिता आर्थिक तरतूद नव्हती. हा तरण तलाव सुरू झाल्यास नागरिक व जलतरणपटूंचा ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे व रामा साळवी तरण तलाव येथील फेरा टळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक वास्तूंचे केवळ अनावरण केले जाते. त्यानंतर या वास्तू धूळखात पडण्याची मोठी मालिकाच वर्तकनगर परिसरात दिसून येते. त्यामुळे या वास्तूंचे अनावरण होताच त्या नागरिकांसाठी खुल्या कराव्यात. जेणेकरून नागरिकांना त्याचा वापर करता येईल. पावसाळ्यानंतर तरण तलाव सर्वसामान्यांना खुला होईल अशी अपेक्षा आहे. – संदीप पाचंगे, विभाग अध्यक्ष, मनसे