ठाणे : येथील बाळकुम भागातील एका ३८ मजली इमारतीची लिफ्ट तांत्रिक बिघाड होऊन बंद पडली. या लिफ्टमध्ये इमारतीमधील पाच रहिवाशी अडकून पडले होते. तब्बल २५ मिनिटानंतर त्यांची लिफ्टमधून सुटका करण्यात आली. बुधवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे नागरिक चिंता व्यक्त करत होते.

ठाणे शहरात बुधवारी रात्री विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता. असे असतानाच ठाण्यातील एका मोठ्या संकुलातील लिफ्ट तांत्रिक बिघाडामुळे बंद पडून त्यात पाचजण अडकल्याची घटना समोर आली.

ठाणे येथील बाळकुम भागात वैकुंठ पिरॅमिल सोसायटीत वैराट बिल्डिंग आहे. ही इमारत ३८ मजली आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरती लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ५ व्यक्ती लिफ्टमध्ये अडकल्या होत्या. बुधवारी रात्री शहरात जोरदार पाऊस सुरू होता, त्यावेळी ही घटना घडली. या घटनेनंतर इमारतीमधील रहिवाशांनी धाव घेतली. पण, त्यांनाही लिफ्टमध्ये अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढणे शक्य होत नव्हते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिकांनी देताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाकडून माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही पथकांनी बचावकार्य सुरू केले. पण, त्यात त्यांना यश येत नव्हते. अखेर अग्निशमन दल जवानांच्या मदतीने सुमारे २५ मिनिटाच्या प्रयत्नानंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तीची सुटका करण्यात आली होती. लिफ्टमध्ये एकूण पाचजण अडकलेले होते. त्यात एका दाम्पत्यासह त्यांच्या २ वर्षीय मुलीचा आणि इतर दोन महिलांचा समावेश होता. लिफ्टमध्ये अडकलेल्या एकालाही व्यक्तीला दुखापत झालेली नाही.