ठाणे : ग्रंथालयातील सभासदांची संख्या वाढून वाचन संस्कृती वाढावी, या उद्देशातून ठाणे शहरातील सर्वात जुन्या असलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालयाने यंदाच्या वर्षात विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यात ग्रंथालयाच्या आधुनिक सेवासुविधा, स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध साहित्य, वाचकाभिमुख उपक्रम आणि घरपोच पुस्तक सेवा असे उपक्रम राबविले जात असून त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्या वर्षभरात जेमतेम ३४१ सभासदांची नोंदणी झाली होती तर, यंदाच्या वर्षातील पाच महिन्यातच ३२१ सभासदांची नोंदणी झाली आहे.
ठाणे शहरातील मराठी ग्रंथ संग्रहालय ही एक जुनी संस्था आहे. ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वाचकांची वैचारिक भुक भागविण्याचे काम करत आहे. विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वाचकांसाठी उपयुक्त साहित्य, स्पर्धा परीक्षांसाठीचे साहित्य, घरपोच पुस्तक सेवा, कार्यशाळा, करिअर कट्टा, कवी कट्टा, वाचन कट्टा अशा विविध उपक्रम राबविले जातात. यंदा जानेवारी महिन्यामध्ये ग्रंथालयाने शहरातील विवियाना मॉलमध्ये विस्तारित वाचनकक्ष सुरु केला. माॅलमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना साहित्याची ओढ निर्माण व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या कक्षाचा सकारात्मक परिणाम सभासद वाढीवर दिसून येत आहे. शिवाय, घरपोच पुस्तक सेवा यामुळे घरबसल्या वाचनसुविधा मिळत असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि व्यस्त जीवनशैली असलेल्यांना ही योजना फायदेशीर ठरत आहे.
चौकट
सध्या ग्रंथालयात एकुण ३ हजार २०६ सभासद आहेत. यामध्ये गेल्यावर्षी म्हणजेच २०२४ या वर्षभरात नवीन ३४१ नवीन सभासदांनी नोंदणी झाली होती. तर, यंदाच्या वर्षात म्हणजेच जानेवारी ते मे या कालावधीमध्ये ३२१ नवीन सभासदांनी नोंदणी झाली आहे. यात सरस्वती मंदिर, शारदा मंदिर, विवियाना मॉल येथील विस्तारित कक्ष, घरपोच पुस्तक सेवांमधील सभासदांचा समावेश आहे. शहरातील नौपाडा परिसरात असलेल्या सरस्वती मंदिर शाखेत १५३ सभासदांची नोंद झाली आहे. तसेच शारदा मंदिर शाखेत ७५, विवियाना मॉल येथे ६०, तर घरपोच पुस्तक योजने मध्ये ३३ सभासदांनी नावनोंदणी केली आहे.
अभ्यासिकेला प्रतिसाद
मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वाचन अभ्यासिकेचा वापर गेल्या सहा महिन्यांत सातत्याने सुरू आहे. जानेवारी ते जून या कालावधीत एकूण ६०७ वाचकांनी अभ्यासिकेचा लाभ घेतला आहे. यामध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक ११५ वाचकांनी, तर मार्चमध्ये ११० आणि जानेवारीत १०९ वाचकांनी अभ्यासिकेचा वापर केला. फेब्रुवारीत १०६ वाचक, मे महिन्यात ८७, तर जूनमध्ये ८० वाचकांनी लाभ घेतला. या आकडेवारीवरून परीक्षा कालावधी आणि अभ्यासपूर्ण वातावरणाची गरज लक्षात घेता, विद्यार्थ्यांचा अभ्यासिकेकडे कल अधिक असल्याचे स्पष्ट होते. तसेच, मे-जून महिन्यांत सुट्ट्यांचा प्रभाव वाचकसंख्येवर दिसून येत आहे.
मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. विविध कट्ट्यांचे आयोजन केले जाते. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यरत अधिकारी तसेच साहित्यिकांचे व्याख्याने आयोजित केली जातात. यामुळे इतर वाचकांसह तरुणांचा ओढा ग्रंथालयाकडे वाढत आहे. अभ्यासिकेसाठी येणाऱ्या तरुणांना लागणारे संदर्भ साहित्य, अभ्यासासाठी जागा आणि करिअर मार्गदर्शनाचे उपक्रम यामुळे सभासद संख्येत वाढ होत आहे.- विद्याधर ठाणेकर, अध्यक्ष, मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे</strong>
एकूण सभासद आकडेवारी
सरस्वती मंदिर शाखा – १ हजार ९२३ सभासद
शारदा मंदिर शाखा – १ हजार १९० सभासद
विवियाना मॉल शाखा – ६० सभासद
घरपोच सेवा – ३३ सभासद