ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मॅरेथाॅन स्पर्धा संपविल्यानंतर घरी गेलेल्या बेनी देवासी (४५) यांचा अचानक मृत्यू झाला. बेनी यांनी दोन महिन्यांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेतील काॅम्रेड मॅरेथाॅन ही अतिशय खडतर मॅरेथाॅन पार केली होती. यानंतर त्यांच्यावर सर्वच धावपटूंकडून कौतुकाचा वर्षाव केला जात होता. मॅरेथाॅनमधील सहभागानंतर बेनी आणि त्यांच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. परंतु अवघ्या दोन महिन्यांनंतर ठाण्यातील मॅरेथाॅन संपवली. परंतु ही मॅरेथाॅन त्यांच्या आयुष्यातील शेवटची मॅरेथाॅन ठरली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ व्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी ठाण्यात करण्यात आले होते. या स्पर्धेत हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेची सुरुवात ठाणे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयाजवळून झाली. स्पर्धेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखविला होता. त्यानंतर, टप्प्याटप्याने एकूण १२ गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला.

परदेशात नोकरीला असणारे बेनी हे त्यांच्या कुटुंबासह ठाण्यातील वसंत विहार भागात राहत होते. त्यांनी ठाण्यातील मॅरेथाॅन स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांची पत्नी देखील त्यांच्या सोबत होती. २१ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत भाग घेऊन ती स्पर्धा त्यांनी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी विविध धावपटूंसोबत छायाचित्र काढले, त्यांच्यासोबत अनुभव शेअर केला. बेनी हे देश-विदेशातील विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅन स्पर्धांमध्ये सहभाग घेत.

दोनच महिन्यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील काॅम्रेड मॅरेथाॅन ही खडतर मॅरेथाॅन पार केली होती. यानंतर त्यांच्यावर सर्वच धावपटूंकडून कौतुकाचा वर्षाव केला जात होता. कारण ही स्पर्धा तब्बल ९० किमी अंतराची होती. त्यामुळे समाजमाध्यमावर त्यांचे मित्र-मंडळी, नातेवाईक खूष होते. आरोग्य सदृढ ठेवण्याचा त्यांचा नेहमी कल असायचा. त्यांच्या निवासस्थानी त्यांनी मॅरेथाॅनमध्ये जिंकलेली अनेक पदके ठेवण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्र -मंडळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमके काय झाले?

२१ किलोमीटर स्पर्धेत धावल्यानंतर ते घरी गेले होते. घरी जाऊन झोपल्यानंतर त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.