उल्हासनगर : अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाक्याजवल एका महिलेकडून तब्बल १४ लाख रूपयांचा मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या महिलेला नालासोपारा येथील एका व्यक्तीने हा एमडीचा साठा दिल्याची माहिती तिने पोलीस चौकशीत दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी महिलेसह नालासोपारा येथील एकावर गुन्हा दाखल केला आहे. अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या शहरात गेल्या काही महिन्यात अशा अनेक कारवाया झाल्या आहेत. त्यानंतरही या प्रकारांवर आळा बसताना दिसत नाही.
उल्हासनगर परिमंडळ चारमध्ये गेल्या काही महिन्यात अमली पदार्थ सेवन करत असताना अनेक जणांना रंगेहात अटक केली आहे. त्यातही गांजा या अमली पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण तरूणाईमध्ये वाढल्याचे दिसून आले आहे. उल्हासनगर शहरातील विविध निर्जन ठिकाणी, सार्वजनिक शौचालय आणि मोकळ्या मैदानात असे गांजा ओढण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले तरी तसे प्रकार थांबताना दिसत नाही.
नुकतीच परिमंडळ चारच्या गुन्हे शाखेच्या घटक चारच्या पोलिसांनी एका कारवाीत तब्बल १४ लाक ३१ हजार रूपयांचा मेफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. अंबरनाथ तालुक्याच्या नेवाळी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. नेवाळी चौकातुून काटईकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बंद असेलल्या ढाब्याजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी महिला नौशिन शेख हिने तिच्या ताब्यात ७१.०३ ग्रॅम एवढा मेफेड्रॉनचा साठा ठेवला होता. या मेफेड्रॉनची ती विक्री करणार होती. मात्र गुन्हे शाखेच्या घटक चारच्या पोलिसांनी सापळा रचून तिला अटक केली. हा मेफेड्रॉनचा साठा या महिलेकडे कसा आला याचा शोध पोलिसांनी घेतला असता तिने याबाबत खुलासा केला. नालासोपारा येथील इम्रान हबीब खान (२६) याच्याकडून हा साठा घेतल्याची माहिती त्या महिलेने दिली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वीही कारवाई परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तालयाच्या क्षेत्रात उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अमली पदार्थ विक्री आणि सेवनाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मे महिन्यात पोलिसांनी अंबरनाथ शहरातून मोठा साठा जप्त केला होता. तर परिमंडळ चारच्या पोलिसांनी गेल्या तीन महिन्यात केलेल्या कारवाई अनेक तरूणांना गांजा सेवन करताना पकडले आहे. त्यामुळे तरूणाई नशेच्या जाळ्यात अडकत असल्याने चिंता व्यक्त होते आहे.