ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा’ योजनेअंतर्गत ठाणे महापालिका आणि आयआयटी-मुंबई संयुक्तपणे नवजात बालकांच्या सुदृढ व सुयोग्य वाढीसाठी उपक्रम सुरू करणार आहे. त्याचा सामंजस्य करार लवकरच केला जाणार असून महापालिका क्षेत्रात या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाईल. उपक्रमात बाळाच्या जन्मापासून ते १० महिन्यांपर्यंत बाळाचे पोषण आणि मातेची काळजी याकडे विशेष लक्ष दिले जाईल. या सोबतच बाळाला स्तनपान देण्याच्या विशिष्ट पद्धतीवर भर दिला जाणार आहे.

आयआयटी-मुंबईसोबत कार्यरत असलेल्या ‘सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव फॉर रुरल एरिया’च्या डॉ. रुपल दलाल यांची ही संकल्पना असून राज्यातील इतर काही जिल्ह्यांत त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. बाळाच्या जन्मापासून सहा महिने बाळाला इतर कोणताही आहार देण्याऐवजी मातेचे दूध देणे हे बाळाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. केवळ स्तनपान देवून बाळाच्या सर्वांगीण वाढीचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य होत नाही. स्तनपान जर योग्य पद्धतीने झाले तरच ते माता आणि बाळाच्या दृष्टीने उपयोगी ठरते. बाळाला मातेच्या दुधाचा संपूर्ण क्षमतेने लाभ होऊन बाळाचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागतो.

हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीतील विना परवाना बाजार भरविणाऱ्या मालकांना नोटिसा, खासगी बाजार चालकांमध्ये खळबळ

यापूर्वी, ज्या जिल्ह्यात या पद्धतीचा अवलंब झाला आहे त्या ठिकाणी त्या बाळाच्या वाढीच्या आलेखात लक्षणीय बदल दिसला आहे. जर गरोदर मातांना हे प्रशिक्षण बाळाच्या जन्मापूर्वी दिले तर मातांना त्याचा वापर करणे शक्य होईल. तसेच, संपूर्ण सहा महिने योग्य पद्धतीने स्तनपानाचा लाभ घेणाऱ्या बाळाची अपेक्षित वाढ साध्य करणे शक्य होईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. या उपक्रमासाठी ठाण्यातील अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्यातून ५० प्रशिक्षक निवडले जातील. त्यांना आयआयटी-मुंबईच्या तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षक अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना प्रशिक्षण देतील. शेवटी, त्यांच्या माध्यमातून गरोदर माता, स्तनदा माता यांना या उपक्रमाची माहिती व प्रात्यक्षिक देण्यात येईल, असेही बांगर यांनी स्पष्ट केले.

हा उपक्रम मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार असून त्यासाठी मोबाईल अ‍ॅप वापरले जाईल. मातांना हे तंत्र चांगल्या पद्धतीने समजावून देण्यासाठी बोली भाषेतील चित्रीकरणाच्या माध्यमातून ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, वैयक्तिक समुपदेशन आणि प्रतिसाद घेण्यावरही भर दिला जाणार आहे. स्तनपान पद्धतीशिवाय या उपक्रमात माता आणि बालकांना पूरक पोषण आहार काय असावा याचीही माहिती उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी स्थानिक परिसरात उपलब्ध असलेली धान्य, भाज्या यांच्या पाककृतीबाबतीतही माहिती दिली जाईल.

हेही वाचा – डोंबिवलीत घातक रसायनामुळे कामगार गंभीर जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा’ योजनेअंतर्गत माता व बालक यांच्या पोषणासाठी व त्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. हा उपक्रम कालबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्वांत महत्त्वाचा दुवा हा आशा आणि अंगणवाडी सेविका यांचा आहे. हा उपक्रम संस्थात्मकदृष्या आरोग्य विभागाकडून स्वीकारला जाईल व भविष्यातही त्याची अंमलबजावणी होईल असे बांगर यांनी नमुद केले.