ठाणे : गेल्याकाही महिन्यांपासून घोडबंदर येथील गायमुख घाटाची अक्षरश: चाळण झाली आहे. दररोज होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे नोकरदार हैराण झाले असून आता या घाटाची काँक्रीटचा वापर करुन दुरुस्ती करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात प्राधिकरणांकडून दुरुस्तीचे विविध प्रयोग करण्यात आले. परंतु दरवर्षी पावसाळ्यात घाट रस्त्यात खड्डे पडत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई अहमदाबाद मार्गे गायमुख घाटातून हजारो नोकरदार ठाण्याच्या दिशेने वाहतुक करतात. गुजरात, वसई, विरार भागातून जेएनपीटी बंदराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांसाठीही हा मार्ग महत्त्वाचा आहे. गेल्याकाही दिवसांपासून येथील फाऊंटन हॉटेल ते गायमुख घाट या ठाण्याच्या दिशेने वाहतुक होणाऱ्या रस्त्याची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यावर खडी, डांबर टाकूनही रस्त्यावर खड्डे पडतात. त्यामुळे या मार्गावर वाहतुक कोंडी होत आहे. त्याचा परिणाम नोकरदार आणि अवजड वाहन चालकांना सहन करावा लागतो. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी अनेकजण विरुद्ध दिशेने वाहतुक करतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. अनेकदा मुंबई-अहमदाबाद मार्गावरील चिंचोटीपर्यंत ही वाहतुक कोंडी होते.
ठाण्यातील वाहतुक कोंडी संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात एक बैठक झाली. या बैठकीस ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, ठाणे महापालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले, घोडबंदर रोडचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मिरा-भाईंदर महापालिका, एमएमआरडीए, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गायमुख घाटातील खड्ड्यांमुळे वाहनांचा खोळंबा होत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. त्यावर, या रस्त्याचा मूळ ढाचा वाहून गेला असल्याने तेथे कोणतीही उपाययोजना टिकत नाही. मात्र, वाहतुकीच्या सोयीसाठी वारंवार रस्त्याची दुरुस्ती करत असल्याची माहिती मीरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी दिली. त्यासंदर्भात, पावसाळा असल्याने खड्डे भरताना रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचा वापर करण्याची सूचना नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी केली.
रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचा प्रयोग मीरा-भाईंदर महापालिकेने तत्काळ करून पाहावा. हे कॉंक्रिट कमीत कमी वेळात एकजीव होते. त्यामुळे रस्ता बंद करण्याची गरज नसते. नागरिकांना घाट रस्त्याच्या वाईट स्थितीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर घाट परिसर लगेच त्याच पद्धतीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. उपलब्ध सर्व यंत्रणेचा वापर करून स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून चार तासांच्या अवधीत एखाद्या मार्गिकेवरील पट्ट्यात हा प्रयोग करावा, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
घोडबंदर रस्त्यावरील सेवा रस्ता आणि मुख्य रस्त्याच्या एकत्रीकरणाचे काम पावसाळ्यामुळे थांबलेले आहे. काही ठिकाणी एकत्रीकरण झाले असले तरी मूळ रस्ता आणि नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता असमान झाला आहे. त्यामुळे संपूर्ण घोडबंदर रस्त्याची एमएमआरडीएने पाहणी करून आवश्यक तेथे रस्ता एकसमान करावा आणि दुरुस्ती करावी अशा सूचना देखील आयुक्तांनी बैठकीत दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने कासारवडवली सिग्नल, ओवळा सिग्नल, कापूरबावडी उड्डाणपूल येथील रस्त्याची दुरूस्ती तत्काळ पूर्ण करावी, असेही निर्देश राव यांनी दिले.