ठाणे : शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते, त्या ठिकाणांची पाहणी गुरुवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. सखल भागात साचत असलेले पाणी पंपच्या साहाय्याने नाल्यात सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच रस्त्याखालील गटारे पुन्हा स्वच्छ करावीत असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
विटावा भुयारी मार्ग, पेढ्या मारुती परिसर, मासुंदा तलाव, वंदना सिनेमा परिसर, चिखलवाडी, भांजेवाडी, ज्ञानसाधना महाविद्यालय परिसर या ठिकाणच्या सखल भागांची पाहणी राव यांनी केली. विटावा भुयारी मार्ग येथे २४ तासांसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच हवामान खात्याकडून येणारा पावसाचा इशारा व भरतीच्या वेळा पाहून या ठिकाणचे पंप सुरू ठेवण्याच्या सूचना राव यांनी दिल्या. वंदना सिनेमा परिसर पावसाळ्यात जलमय होतो. या ठिकाणी महापालिकेने पंप उपलब्ध केले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात या ठिकाणी महापालिका कर्मचारी उपलब्ध करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
चिखलवाडी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. पावसाळ्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. महापालिका हद्दीतील ३०० किमी नाल्याची सफाई करण्यात आलेली आहे. महापालिका क्षेत्रात एकूण ३४ सखल भाग असून त्यापैकी १४ सखल भागात थोड्याशा पावसात पाणी साचते. यासाठी एकूण ६४ पंपची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.