पाणीदरात वाढ होण्याची शक्यता
ठाणे : मार्च महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्यानंतर ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादरीकरणास मुहूर्त सापडला असून महापालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर हे आज, बुधवारी दुपारी स्थायी समितीपुढे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. घरगुती व व्यावसायिक पाणीवापराच्या दरात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेपुढे प्रशासनाने अंतिम मंजुरीसाठी पाठविला असून त्यामुळे या दरवाढीचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे सादर करण्यात येतो. या अर्थसंकल्पावर स्थायी समितीमध्ये चर्चा होऊन त्यात काही बदल सुचविण्यात येतात आणि त्यानंतर हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला जातो. त्यास सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाते. गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम शहरातील विकासकामांना बसतो. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दीड महिन्यांपूर्वी पत्र पाठविले होते. त्यात ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर होऊन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळीच कार्यवाही करण्याची मागणी केली होती. असे असले तरी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांवरून निर्माण झालेल्या वादामुळे अर्थसंकल्प लांबणीवर पडल्याने सत्ताधारी शिवसेनेसह लोकप्रतिनिधींमध्ये अस्वस्थता पसरली होती. मार्च महिना उजाडला तरी अर्थसंकल्प सादरीकरणाची तारीख जाहीर होत नसतानाच आयुक्त जयस्वाल हे सुटीवर निघून गेले. त्यामुळे अर्थसंकल्प सादरीकरणाचे काय होणार, अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. अखेर महापालिका प्रशासनाला अर्थसंकल्प सादरीकरणास मुहूर्त सापडला असून महापालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर हे स्थायी समितीपुढे अर्थसंकल्प सादर करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
प्रस्तावांवर अद्याप निर्णय नाही
ठाणे महापालिका क्षेत्रातील घरगुती तसेच व्यावसायिक पाणीवापराच्या दरात ४० ते ५० टक्क्यांनी, तर ठाणे परिवहन उपक्रमातील बसगाडय़ांच्या तिकिटदरात २० टक्क्यांनी वाढ करण्यासंबंधीचे प्रस्ताव प्रशासनाने तयार केले होते. हे दोन्ही प्रस्ताव फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, वेळेअभावी ही सभा खंडित करण्यात आल्याने या दोन्ही प्रस्तावांवर अद्याप निर्णय झालेला नाही. गेल्या वर्षी परिवहन समितीने बस तिकीट दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने प्रशासनाने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब परिवहनच्या अर्थसंकल्पात उमटले नसले तरी पाणी दरवाढीचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये उमटण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.