ठाणे: ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने करवसुलीवर भर देत १ एप्रिलपासून करदात्यांना कराची देयके पाठविण्याबरोबरच मोबाईलवर लघु संदेश पाठविले असून त्यास प्रतिसाद देत ठाणेकरांनी महिनाभरात ९५ कोटी ३२ लाख रुपयांचा कर भरला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या कर वसुलीत १२ कोटींनी वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. तसेच ९५ कोटींपैकी ७५ कोटी रुपये नागरिकांना ऑनलाईनद्वारे भरले आहेत.

ठाणे महापालिकेने २०२४-२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर विभागाला ८५० कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी वर्षाअखेर म्हणजेच मार्च महिनाअखेर ८१० कोटी रुपयांची कर वसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आले होते. ९५ टक्क्यांच्या आसपास मालमत्ता कराची वसुली झाली असली तरी, गेल्यावर्षीच्या तुलनेत या कर वसुलीत १०८ कोटी रुपयांनी वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता.

यंदाच्या वर्षात म्हणजेच २०२५-२६ या आर्थिक वर्षात पालिकेने मालमत्ता कर विभागाला ८१९ कोटी ७१ लाख रुपयांच्या करवसुलीचे उद्दीष्ट ठरवून दिले असून हे उद्दीष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर विभागाने १ एप्रिलपासूनच पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १ एप्रिल रोजीच या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके पालिकेने करदात्यांपर्यत पाठवली आहेत. त्याबद्दलचा लघुसंदेश (एसएमएस) मालमत्ता करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविला होता. त्यास प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी सुमारे १५७० ठाणेकर करदात्यांनी १ कोटी ८० लाख रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा केला होता. असाच प्रतिसाद ठाणेकरांनी महिनाभरात दाखविला असून यामुळे पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी ९५ कोटी ३२ लाख रुपये जमा झाले आहेत.

गेल्यावर्षीपेक्षा यंदा जास्त वसुलीगेल्यावर्षी म्हणजेच २०२४-२५ या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात ८३ कोटी २० लाख रुपयांची कर वसुली झाली होती. यंदाच्या वर्षात एप्रिल महिन्यात ९५ कोटी ३२ लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. त्यामुळे यंदा कर वसुलीत १२ कोटी १२ लाख रुपयांनी वाढ झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घोडबंदर आघाडीवर तर, वागळे आणि दिवा पिछाडीवर

घोडबंदर भागासाठी असलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातून सर्वाधिक ३६ कोटी १ लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. तर, सर्वात वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रातून सर्वात कमी २ कोटी ६७ लाख आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातून २ कोटी ९४ लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. याशिवाय, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातून ८ कोटी २४ लाख, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातून १२ कोटी ४२ लाख, कळवा प्रभाग समिती क्षेत्रातून ३ कोटी १४ लाख, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समिती क्षेत्रातून प्रत्येकी ३ कोटी १४ लाख, लोकमान्य-सावकरनगर प्रभाग समिती क्षेत्रातून ३ कोटी ३५ लाख, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातून १९ कोटी ७० लाख आणि महापालिका मुख्यालय येथील केंद्रात ३ कोटी ७० लाखांचा कर जमा झाला आहे.