Thane municipal corporation : ठाणे : पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणाऱ्या ठाणे महापालिकेने कृत्रिम तलाव, निर्माल्य संकलनपाठोपाठ ठाणे महापालिकेचे आणखी एक पर्यावरणपूरक पाऊल उचलले आहे. त्याचाच भाग म्हणून पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने सलग दुसऱ्या वर्षी, गणेश विसर्जनासाठी करिता येणाऱ्या नागरिकांना शेवगा वृक्षांची मोफत रोपे वाटप केली. उपमुख्यमंत्री हरित अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

ठाणे शहरास हरित, पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त बनविण्याच्या दृष्टीने ‘उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियान’ पालिकेकडून राबविण्यात येत आहे. या अभियानात, ठाण्यात एकूण दोन लाख पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यात, मियावाकी पद्धतीने ३० हजार झाडे, विविध विकासकांमार्फत पाच हजार झाडे, खाजगी संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, निवासी गृहसंकुले आणि शासकीय कार्यालयांच्या सहभागातून पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच, शेवग्याची १० हजार लावण्यात येणार आहेत. त्यापैकी पाच हजार झाडे लावली आहेत.

या झाडांची लागवड

या अभियानात, नागरिक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, गृहसंकुले, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संरक्षण क्षेत्रातील विविध संस्था यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येत आहे. तसेच या वृक्षारोपण अभियानात, पळस, बेल, नीम, कांचन, सिताअशोक, जांभूळ, पारिजातक, शिसम, कोकम, शिवण, करंज, अडुळसा, तगर, लिंबू, कामिनी, बकूळ, बांबू आदी देशी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.

गतवर्षी सव्वा लाख झाडांची लागवड

गेल्या वर्षी या अभियानात ठाणे महापालिकेने एकूण एक लाख २७ हजार झाडे लावली. त्यापैकी, ठाण्यातील सर्व प्रभागांमध्ये ४९ हजार २४४ झाडे लावण्यात आली. नागला बंदर येथे १५०० झाडे मियावाकी पद्धतीने लावण्यात आली. तसेच, महापालिका आणि खाजगी शाळा, महाविद्यालये येथे ५४०० झाडे लावण्यात आली. ठाण्यातील मेट्रो मार्गाखाली तसेच इतरत्र ११ हजार बांबूची झाडे लावण्यात आली. त्याचबरोबर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे ६० हजार झाडे लावण्यात आली. त्यात ४० हजार पारंपरिक पद्धतीने तर, २० हजार झाडे मियावाकी पद्धतीने लावण्यात आल्याचा दावा पालिकेने केला होता.

यंदा विनामूल्य शेवगा रोपांचे वाटप

उपमुख्यमंत्री हरित अभियानात ठाणे महापालिका क्षेत्रात वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने, सलग दुसऱ्या वर्षी, गणेश विसर्जनासाठी करिता येणाऱ्या नागरिकांना शेवगा वृक्षांची मोफत रोपे वाटण्यात आली. रेतीबंदर व इतर विसर्जन घाट येथे एकूण ५००० शेवगा रोपांचे वाटप कऱण्यात आले. या अभियानाचे संयोजन उपायुक्त मधुकर बोडके आणि उद्यान निरीक्षक केदार पाटील यांनी केले.