ठाणे : कळवा परिसरातील अनेक माजी नगरसेवक पक्षाला सोडून गेल्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा पक्षबांधणीचे काम सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून ठाणे शहरातील पक्षाच्या विविध सेलवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीदरम्यान, पक्षवाढीसाठी ठाणे शहरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगत आमचा पक्ष पूर्ण ताकदीने ठाणे महानगर पालिकेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी केली आहे.
ठाणे महापालिका निवडणुका पार्श्वभूमीवर शहरात पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. कळवा-मुंब्रा हा परिसर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडून गणिते आखली जात होती. त्यासाठीच भाजपकडून कळव्यातील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नगरसेवकांना गळा लावण्याचे प्रयत्न सुरू होते. असे असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नगरसेवकांना गळा लावत पक्ष प्रवेश देऊन आव्हाडांना धक्का देत भाजपला शह दिला.
आमदार आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेले माजी विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. यामुळे कळव्यासग ठाणे शहरात राष्ट्रवादी पक्षाची ताकद कमी झाल्याची चर्चा असतानाच, आमदार आव्हाड यांनी पक्ष मेळाव्यांच्या माध्यमातून पक्ष बांधणीचे काम पुन्हा सुरू केले आहे. त्यापाठोपाठ आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील पक्षाच्या विविध सेलवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी जाहीर केली आहे.
आमदार आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष पूर्ण ताकदीने ठाणे महानगर पालिकेची निवडणूक लढविणार आहे. ठाणेकरांमध्ये सत्ताधारी वर्गाविरोधात असंतोष आहे. ठाणेकरांना आपण सक्षम पर्याय देणार असून त्यासाठी जनमानसांत फिरणार आहोत. शिवाय, सक्रीय कार्यकर्त्यांची फळी उभी केली जाणार आहे, असे सुहास देसाई यांनी सांगितले.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ठाणे जिल्हा शहराध्यक्ष सुहास देसाई आणि ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पक्षाच्या विविध सेलवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यानुसार व्यापारी सेल ठाणे जिल्हा अध्यक्षपदी संजीव दत्ता, हॉकर्स सेल ठाणे जिल्हा अध्यक्षपदी विक्रम सिंह, हॉकर्स सेल ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी मनीषा म्हात्रे, सोशल मीडिया सेल ठाणे अध्यक्षपदी आशिष शर्मा, डॉक्टर सेल ठाणे जिअध्यक्षपदी डाॅ. सुभाष यादव, ज्येष्ठ नागरिक सेल ठाणे अध्यक्षपदी दिलीप नाईक, ज्येष्ठ सेल ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी दिलीप लोखंडे, असंघटित कामगार सेल ठाणे अध्यक्षपदी राजू यशवंत चापले, असंघटित कामगार सेल ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनील गुरव, सहकार सेल अध्यक्षपदी नारायण उतेकर, लीगल सेल ठाणे अध्यक्षपदी विनोद उतेकर, सिख समाज सेल अध्यक्षपदी जगत सिंग परोचे, वाल्मिक समाज सेल अध्यक्षपदी हरिवंश चौहान, वाल्मीक समाज सेल ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी हरीओम चौटेला, ग्रंथालय सेल अध्यक्षपदी वर्षा साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.