ठाणे : विरारमध्ये नुकतीच घडलेली दुर्दैवी इमारत दुर्घटना लक्षात घेता, ठाणे शहरातही अशा दुर्घटनांचा धोका वाढू नये म्हणून ठाणे महानगरपालिका सतर्क झाली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शहरातील धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासोबतच, महापालिका प्रशासनाने एक अधिकृत पत्रक जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, धोकादायक इमारती कशा ओळखाव्यात आणि त्याबाबत कोणती काळजी घ्यावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
ठाणे महानगरपालिकेने यापूर्वीही वेळोवेळी नोटिसा व जाहिर सूचनांद्वारे अशा इमारतींची माहिती दिली असून, संरचनेचा स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत वास्तव्यास योग्य आहे की नाही, हे ठरवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील अतिधोकादायक इमारतींची यादीही जाहीर केली आहे. मात्र, काही नागरिक अजूनही महापालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यामुळे अशा इमारतींमध्ये पाणी मुरून संरचनात्मक कमकुवतपणा अधिक वाढतो आणि अशा स्थितीत दुर्घटनेचा धोका अधिक गंभीर होतो. विरारमधील अलीकडील दुर्घटनेत काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ठाण्यातील परिस्थितीकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त पत्रकाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत. त्यात धोकादायक इमारत कशी ओळखावी आणि काय काळजी घ्यावी याबाबत नागरिकांना सल्ला देण्यात येत आहे.
धोकादायक इमारती ओळखण्यासाठी लक्षणे
महानगरपालिकेने खालील लक्षणांवर नागरिकांनी लक्ष ठेवावे असे आवाहन केले आहे:
- इमारतीचे कॉलम, बीम, स्लॅब झुकल्यासारखे भासणे
- तळमजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे
- कॉलममध्ये भेगा पडणे व वाढणे
- काँक्रीट झिरपणे, फुगणे किंवा गळून पडणे
- कॉलम, बीम व विटांच्या भिंतींमध्ये भेगा
- स्लॅब/बीमच्या तळभागातून काँक्रीट गळणे
- प्लास्टरमध्ये मोठ्या प्रमाणात भेगा
- इमारतीमधून विशिष्ट आवाज येणे
- शिगा गंजल्यामुळे लोखंडी सळ्यांचा आकार कमी होणे
तात्काळ घ्यावयाची काळजी:
वरील कोणतीही लक्षणे दिसल्यास रहिवाशांनी खालीलप्रमाणे त्वरित पावले उचलावीत: - प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क – हेल्पलाईन क्र.: ८६५७८८७१०१ / ०२२-२५३७१०१०
- इमारत तात्काळ रिकामी करावी
- शेजारील रहिवाशांनाही सतर्क राहण्यास सांगावे
- आर.सी.सी. तांत्रिक सल्लागारांकडून तात्काळ तपासणी करून आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करावी
भविष्यातील दुर्घटना टाळता येतील
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची जिवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने जागरुक राहणे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे आपण सर्वजण जबाबदार नागरिक म्हणून आपापल्या परिसरातील इमारतींवर लक्ष ठेऊया जेणेकरुन भविष्यातील दुर्घटना आपणांस टाळता येतील, असे आवाहन महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त पत्रकाद्वारे करत आहेत.