ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून कचरा उचलण्यात येत नाही. यामुळे शहरात कचऱ्याचे समस्येने उग्र रुप धारण केले आहे. कचऱ्याचे ढिग अनेक ठिकाणी साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आणि ते शहरातील कचरा वाहनांमध्ये भरून ठाणे महापालिका मुख्यालयावर फेकण्यासाठी निघाले. पण, पोलिसांनी हि वाहने अडवून त्यांना रोखले.
ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याची समस्या सातत्याने निर्माण होत आहे. ठाणे महापालिकेकडे कचराभुमीसाठी स्वत:ची जागा नव्हती. यामुळे राज्य शासनाने ठाणे महापालिकेला भिवंडीतील आतकोली परिसरात कचराभुमीसाठी जागा दिली आहे. शहरापासून ही जागा खूप दूर आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागातील कचरा हस्तांतरण केंद्रावर जमा करून तो आतकोली येथे नेण्यात येत आहे. या जागेवर कचरा प्रकल्प उभारणीसाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच डायघर भागातही पालिकेने कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारला आहे. यामुळे शहरातील कचरा समस्या सुटेल अशी शक्यता वर्तविली जात असली तरी, शहरात सातत्याने कचरा समस्या निर्माण होत आहे. अशाचप्रकारे मुंब्रा शहरात आता कचरा समस्येने उग्र रुप धारण केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंब्र्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुंब्रा, कौसा येथील कचरा समस्या आता उग्र रूप धारण करू लागली आहे. गेल्या पाच दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही. शहरातील कचरा उचलावा, यासाठी अनेकवेळा संबधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्यामुळे ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते शानू पठाण हे संतप्त झाले. यातूनच कौसा, अमृत नगर, रशीद कंपाउंड या भागातील कचरा त्यांनी मुख्यालयासमोर फेकण्याचा निर्धार केला होता. यानुसार ते कार्यकर्त्यांना घेऊन निघाले. त्यांनी कौसा, अमृत नगर, रशीद कंपाउंड या भागात वाहने नेली आणि त्यात त्यांनी तिथे साठलेला कचरा भरला. ही वाहने घेऊन ते ठाणे महापालिकेच्या दिशेने निघाले. या गाड्या ते ठामपा मुख्यालयासमोर रिकाम्या करणार होते. परंतु या आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन या गाड्या अडविल्या. त्यानंतर पोलिसांनी शानू यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
डायघर येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पामध्ये काही तांत्रिक कारणास्तव कचरा प्रक्रीया संथगतीने सुरू होती. यामुळे मुंब्य्रातील कचरा संकलनाचे वेळापत्रक बिघडल्यामुळे अनेक ठिकाणी कचरा साठत होता. मात्र, कचरा प्रक्रीयेचे काम सुरळीतपणे सुरू झाले आहे. आता अधिक वाहनांद्वारे कचरा उचलण्याचे काम करण्यात येणार आहे, असे ठाणे महापालिका उपायुक्त मनिष जोशी यांनी सांगितले.