ठाणे : कळवा येथील मनिषानगर भागातील ३३ वर्षे जुन्या झालेल्या यशवंत साळवी तरणतलावाच्या वास्तुचे नुतनीकरण करताना त्याशेजारीच क्लचरल सेंटर उभारणीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु या जागेवर तरण तलवाचे आरक्षण असल्यामुळे क्लचरल सेंटरची उभारणी करणे शक्य नाही. यामुळे पालिकेने ‘तरण तलाव व कल्चरल सेंटर असे आरक्षण करण्याचा प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव आता राज्याच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेचे कळवा येथील मनिषानगर भागात यशवंत साळवी तरण तलाव आहे. या तरण तलावाची उभारणी महापालिकेेने १९९१ साली केली होती. याठिकाणी तळ अधिक एक मजली इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामास ३३ वर्षे पुर्ण झाली आहेत. या तरण तलावाचा वापर कळवा, खारेगाव, ठाणे परिसरातील नागरिकांकडून करण्यात येतो. तसेच याठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाही आयोजित करण्यात येतात.

ही वास्तु जुनी झाल्याने त्याचे नुतनीकरण करण्याची मागणी होत होती. अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी पालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत केली होती. कळवा-खारेगाव भागाचे वाढते नागरिकरण लक्षात घेऊन जलतरण स्पर्धां, सराव आणि इतर विविध खेळांकरीता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. त्यासाठी या जागेवर तरण तलावासह कल्चरल सेंटर उभारणीची आवश्यकता होती.

परंतु ही जागा केवळ तरण तलावासाठी आरक्षित असल्याने त्याजागेवर कल्चरल सेंटर उभारणे शक्य नव्हते. यामुळे पालिकेने या जागेचे आरक्षण बदलण्याचा निर्णय घेऊन त्याठिकाणी तरण तलाव व क्लचरल सेंटर असे आरक्षण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला. हा प्रस्ताव प्रशासनाने ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय सभेने मान्यतेसाठी ठेवला होता.

त्यास सभेने मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव आता अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविला जाणार आहे. शासनाकडून प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर याठिकाणी क्लचरल सेंटर उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कळवा येथील यशवंत साळवी तरण तलावाच्या भुखंडाचे एकूण क्षेत्र ४२७० चौ.मी इतके आहे. जागेवरील जुनी वास्तु पाडून त्याठिकाणी नवीन वास्तु उभारली जाणार आहे. त्यात तरण तलावासोबतच क्लचरल सेंटरची वास्तु उभारली जाणार आहे. त्यासाठी पालिकेने पाऊले उचलली असल्याचे चित्र दिसून येत आहे.