ठाणे : ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांच्या पाहणीनंतर, शहरातील १५१ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली आहे. ही कारवाई १९ जूनपासून नियमितपणे सुरू असून त्यात शीळ येथील एम के कम्पाऊंडमधील २१ इमारतींच्या पाडकमांचाही समावेश आहे. या १५१ अनधिकृत बांधकामांपैकी ११७ बांधकामे संपूर्णपणे पाडण्यात आली असून, उर्वरित ३४ बांधकामांमधील अनधिकृत वाढीव भाग हटवण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने दिलेले निर्देशानुसार महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १९ जूनपासून अतिक्रमणविरोधी मोहिमेला वेग आला आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार नऊ प्रभाग समित्यांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहीमेत प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांकडून नोंदवण्यात आलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.

आतापर्यंत या मोहिमेत ११७ अनधिकृत बांधकामे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.तर, ३४ बांधकामांमधील अनधिकृत वाढीव भाग हटवण्यात आली. अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, प्लिंथचे बांधकाम, अनधिकृत टर्फ अशा प्रकारच्या बांधकामांचा समावेश होता. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती ठाणे महापालिका उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे यांनी दिली.

या मोहिमेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरुपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत. अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये उपायुक्त (परिमंडळ), सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, अतिक्रमण तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅ्क्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येत आहे. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या कारवाईची प्रभागसमिती निहाय्य आकडेवारी (१९ जून ते २४ जुलैपर्यंत)

प्रभाग समिती कारवाई

नौपाडा-कोपरी १०

दिवा ४०

मुंब्रा २०

कळवा १७

उथळसर १०

माजिवडा-मानपाडा २६

वर्तकनगर ११

लोकमान्यनगर १३

वागळे इस्टेट ०४

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण १५१