ठाणे – ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी तसेच विविध भागात केंद्र सरकारच्या योजनेतून ६८ ठिकाणी ‘नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर’ (Urban Health & Wellness Center – UHWC) उभारण्याचे नियोजन होते. परंतु केंद्र सरकारच्या अटीनुसार झोपडपट्टी भागात अधिकृत वास्तु उपलब्ध होत नसल्याने आरोग्यमंदिर उभारणीत अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावर मात करत आता ठाणे महापालिकेने स्वत:च्या जागा शोधून त्याठिकाणी ३० पोर्टा कॅबिन दवाखान्यांची उभारणी करणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १० आरोग्य मंदीरांचा शुभारंभ ११ सप्टेंबरला करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. तर, त्यानंतर उर्वरित आरोग्यमंदिर टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहेत.

ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना घराजवळच दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी एकूण ६८ ‘नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर’ उभारण्याचे नियोजन प्रशानसाने आखले होते. केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून या उपक्रमासाठी पालिकेला निधी उपलब्ध होणार आहे. या आरोग्यमंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारच्या काही अटी होत्या. आरोग्य मंदीर पाचशे चौरसफुट जागेत उभारले जावे, अधिकृत बांधकाम असावे अशी अट होती. ज्याठिकाणी अधिकृत वास्तु उपलब्ध झाल्या, त्याठिकाणी पालिकेने १६ आरोग्य मंदीरे उभारली. परंतु शहरातील झोपडपट्टी भागात अधिकृत वास्तु नसल्यामुळे पालिकेला आरोग्य मंदीर उभारण्यात अडचणी येत होत्या.

३० आरोग्यमंदीरांसाठी जागा निश्चित

झोपडपट्टी भागात आरोग्यमंदीरासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे ठाणे महापालिकेने आता विविध ठिकाणी पोर्टा कॅबिन दवाखान्यांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार महापालिकेच्या मालकीच्या ५१ जागांवर असे दवाखाने उभारणेचे पालिकेने नियोजन आखले आहे. त्यापैकी शहरातील विविध प्रभाग समित्यांमधून ३० पेक्षा अधिक जागांची निवड करत तिथे टप्प्याटप्प्याने पोर्टा कॅबिन दवाखान्यांची उभारणी करण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १० आरोग्य मंदीरांची उभारणी झाली असून त्याचा शुभारंभ ११ सप्टेंबरला करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. या केंद्रांमध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी, नियमित औषधोपचार, लसीकरण, मोफत औषधे, अशा सेवा देण्यात येणार आहेत. नागरिकांनासाठी ही सेवा विनामुल्य असणार आहे.

दहा आरोग्यमंदिरे कुठे असणार

वर्तकनग येथील समता नगर, धर्मवीर नगर, मानपाडा येथील कृष्णा नगर, कोकणीपाडा आणि टिकुजिनिवाडी परिसर, कोपरी, कळवा येथील घोलाईनगर आणि खारेगाव, वागळे इस्टेट, कौसा, उथळसर, शीळ, दिवा, माजिवडा या भागांमध्येही पोर्टा कॅबिनद्वारे दवाखाने उभारले जाणार आहेत. या आरोग्यमंदिरात डाॅक्टर, परिचारिका, औषध कर्मचारी, सफाई कामगार तसेच इतर कर्मचारी असे पाचजण नेण्यात येणार आहेत. सकाळी ९.३० ते ४.३० यावेळेत हे दवाखाने सुरू राहणार आहेत. या दवाखान्यांच्या परिचालनाचा खर्च केंद्र सरकार देणार आहे, असे ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डाॅ. प्रसाद पाटील यांनी दिली.