ठाणे : ठाणे येथील शास्त्रीनगर भागातील ठाणे महापालिकेच्या राखीव मोकळ्या भूखंडावर होत असलेले अनधिकृत गाळे आणि चाळीचे बांधकामास संरक्षण देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप शिंदे गटाचे जेष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी पालिका प्रशासनावर केला होता. याप्रकरणी त्यांनी पालिका मुख्यालयावर स्थानिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा देताच, पालिकेने ही बांधकामे तोडण्याची कारवाई केली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने पथके तयार करून बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली असली तरी भूमाफियांकडून बांधकामे उभारण्याचे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले होते. शास्त्रीनगर येथील ठाणे महापालिकेचे राखीव मोकळे भूखंड अनधिकृत गाळे आणि चाळी बांधून भूमाफिया गिळंकृत करत आहेत. नागरीकांच्या तक्रारीनंतर या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करून भूखंड मोकळे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून या बांधकामाला संरक्षण देण्याचे काम पालिकेच्या अतिक्रमण आणि निष्कासन विभागातील अधिकाऱ्यांनी करीत असल्याचा आरोप शिंदे गटाचे जेष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केला आहे. यावरून पालिकेवर टीका झाली होती.
इशाऱ्यानंतर कारवाई
या अनधिकृत बांधकामांवर पालिका प्रशासनावर टीका होत होती. तसेच या बांधकामांवर तात्काळ कारवाई करा आणि भूमाफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, अन्यथा प्रभाग समिती आणि पालिका मुख्यालयावर स्थानिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा हणमंत जगदाळे यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पालिका अतिक्रमण पथकाने या बांधकामांवर शुक्रवारी कारवाई केली.
चार गाळ्यांचे बांधकाम तोडले
ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार सुरू आहे. लोकमान्य सावरकरनगर परिसरातील शास्त्रीनगर नाल्यावर चार गाळ्यांचे बांधकाम अनधिकृतरित्या सुरू होते. हे बांधकाम पूर्णपणे तोडण्यात आले आहे. तसेच या परिसरातील ज्येष्ठ नागरिक कट्टयालगत, हत्तीपुलाजवळ, शास्त्रीनगर येथे असलेले विट सिमेंटचे ८ पिलर आणि त्याखालील सिमेंटचा कोबा तसेच गाळयासाठी उभारण्यात आलेले ५ भिंतीचे विटसिमेंटचे बांधकाम जेसीबी आणि मनुष्यबळाच्या साह्याने तोडण्यात आले. ही कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य सावरकनगर प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सोमनाथ बनसोडे आणि अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.