ठाणे : कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील झोपडपट्टी भागात कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत कर्करोग तपासणी मोहिम राबविली. यामध्ये एकूण ६८९ नागरिकांची मुख कर्करोग, स्तन कर्करोग आण गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत ३ पुरूष आणि १० महिला या संशयीत रूग्णांना जवळच्या रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅनचे उद्घाटन मुंबईत केले होते. ही व्हॅन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असून २ ते ६ मे या कालावधीत ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात या व्हॅनमार्फत तपासणी अभियान राबविण्यात आले. २ मे रोजी रोझा गार्डनिया, नागरी प्रार्थामक आरोग्य केंद्रात या व्हॅनचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे महानगरपालिका उपायुक्त उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितिल के. आणि माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. वर्षा हेमंत ससाणे हे यावेळी उपस्थित होते. या व्हॅनद्वारे शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये नागरिकांची मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करण्यात आली. यात ३० वर्षावरील महिला आणि पुरूषांची तपासणी करण्यात आली. एकूण ६८९ नागरिकांची कर्करोग तपासणी करण्यात आली.

यात ३२० जणांची मुख कर्करोग तपासणी, १८६ जणांची स्तन कर्ककरोग तपासणी, १८३ जणांनी गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करण्यात आली. झोपडपट्टी भागात राहणारे नागरिक जे त्यांच्या उच्च तपासणीसाठी रुग्णालयांपर्यंत पोहोचू शकत नाही अशा लोकांना या सुसज्ज व्हॅन द्वारे सेवा देण्यात यावी हा या कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचा मुख्य उद्देश आहे. ही व्हॅन प्रथम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रोझा गाडेनिया, सी आर वाडीया, किसन नगर असा दौरा करत अखेरीस लोकमान्य कोरस या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आली.

हि व्हॅन कर्करोगाची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांनी सुसज्ज असून यामध्ये मुख कर्करोगाच्या तपासणीसाठी डेंटल चेअर आणि बायप्सी घेण्यासाठीची आवश्यक उपकरणे तसेच गर्भाशय मुख कर्करोगाच्या तपासणीसाठीची यंत्रणा तसेच स्तन कर्करोग बायोप्सी साठी आवश्यक असलेले उपकरणे उपलब्ध आहेत.

या व्हॅनमार्फत तपासणी करण्यात आलेल्या महिलांपैकी १३१ महिलांची पॅप स्मीअर आणि ३९ महिलांची व्हीआयए तपासणी करण्यात आली. तसेच ७ पुरूष आणि १ महिलेची मुख कर्करोगाच्या निदानाकरीता बायप्सी करण्यात आली. या तपासणीत ३ पुरूष आणि १० महिला या संशयीत रूग्णांना जवळच्या रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असून त्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांचा पाठपुरावा संबंधित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येईल, असे माता बालसंगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे यांनी सांगितले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.