ठाणे : ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थांना गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे गणवेश देण्यास उशीर होत असल्याच्या कारणावरून प्रशासनावर टिका झाली होती. या टिकेनंतर पालिका प्रशासनाने यंदा ३० हजार विद्यार्थ्यांना जून महिन्यात शाळा सुरू होण्यापुर्वी गणवेश देण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावास प्रशासकीय सभेत मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया उरकून विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने आखले आहे.

ठाणे महापालिकेच्या प्राथमिक १०५ आणि माध्यमिक २३ अशा मिळून १२८ शाळा आहेत. या शाळांमधून सद्यस्थितीत ३० हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ठाणे महापालिका शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू असून त्याचे सकारात्मक परिणाम मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालातून दिसून आले होते. ठाणे महापालिकेच्या एकूण २३ माध्यमिक शाळांचा निकाल ९१.९८ टक्के इतका लागला असून गतवर्षी हे प्रमाण ८३.९४ टक्के एवढे होते. तसेच यातील चार माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून गतवर्षी तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता.

ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून शैक्षणिक साहित्यही देण्यात येते. त्यात गणवेशाचा समावेश असतो. मागील दोन वर्ष निवडणुकांमुळे निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब झाला होता. यामुळे शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकले नव्हते. यावरूनच पालिका प्रशासनावर टिका झाली होती. या टिकेनंतर पालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी दिड महिनाआधीच प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावास प्रशासकीय सभेत मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया उरकून विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने आखले आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह गणवेश महापालिका प्रशासनकडून देण्यात येत असतो. यापूर्वी विद्यार्थ्यांना डीबीटी पध्दतीत राबविण्यात येत होती. यानुसार विद्यार्थी गणवेश खरेदी करून त्याची देयके शाळेकडे सादर करत होते. यानंतर पालिका प्रशासनान विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात देयकाचे पैसे जमा करत होते. मात्र, २०२९ पासून डीबीटीची प्रक्रिया बंद होवून महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यामतून गणवेशसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली. परंतु मागील दोन वर्षापासून निविदा प्रक्रिया राबविण्यास झालेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या हाती उशीराने गणवेश पडले होते. यंदा तीच चूक टाळण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने गणवेश देण्याची तयारी आताच सुरू केल्याची माहीती सुत्रांनी दिली.