ठाणे : महापालिका सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे यांच्या कार्यपद्धतीविषयी सातत्याने तक्रारी पुढे येत असतानाच, त्यांनी आता महिला कर्मचाऱ्यांना पिटी सत्रासाठी सरकारी फुल बाह्यांची बनियान आणि सरकारी खाकी हाफ पॅन्ट परिधान करण्याची सक्ती केली आहे. त्यांच्या या नव्या फतव्यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून या संदर्भात त्या आयुक्तांची भेट घेणार आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेचे स्वत:चे सुरक्षारक्षक असून त्यात ८३ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय, भांडुप बोर्ड सुरक्षारक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षारक्षक बोर्डाकडूनही पालिका सुरक्षारक्षक घेते. या सर्वांची महापालिका मुख्यालय इमारत, प्रभाग समिती आणि इतर वास्तुंच्या सुरक्षा करण्यासाठी नेमणुक करण्यात आली आहे. तसेच पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेतही पालिकेचे सुऱक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. या विभागासाठी कंत्राट पद्धतीने निवृत्त पोलिस अधिकारी मच्छिंद्र थोरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या कार्यपद्धतीविषयी सातत्याने तक्रारी पुढे येत आहेत. असे असतानाच नव्या फतव्यामुळे ते पुन्हा वादात सापडले आहेत.
महापालिका सुरक्षारक्षकांना मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पालिकेकडून दररोज पिटी आणि परे़डचे आयोजन करण्यात येते. यासाठी सर्वांना सकाळी ६.४५ वाजता पालिकेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सकाळी ७ ते ७.४५ या कालावधीत पिटी तर सकाळी ८ ते ९ यावेळेत परेड घेण्यात येते. महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील वरांड्यात पिटी आणि परेड घेण्यात येते. पिटी आणि परेडसाठी थोरवे यांनी नवा फतवा काढला असून त्यात गणवेशाची सक्ती केली आहे. त्यानुसार पिटी सत्रासाठी सरकारी खाकी हाफ पॅन्ट, सरकारी फुल बाह्यांची बनियान, सरकारी पिटी कॅनव्हश शूज, खाकी मौजे असा हा गणवेश असून तो महिला कर्मचाऱ्यांना परिधान करण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसा कार्यालयीन आदेश थोरवे यांनी काढला आहे. परंतु महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील वरांड्यात हाफ पॅन्ट परिधान करून पिटीच्या सत्रात सहभागी व्हावे लागणार असल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. या महिलांनी हा प्रकार पालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत त्यांच्यामार्फत आयुक्तांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरु केले असल्याचेही सुत्रांनी सांगितले.