फेटाळलेला प्रस्ताव नव्याने सादर करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली
ठाणे : मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाने बस तिकीट दरात मोठी कपात केल्याने तेथील प्रवाशांना मोठा फायदा होत असतानाच दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाकडून मात्र बस तिकीट दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाडेवाढीचा प्रस्ताव अडचणीचा ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन परिवहन समितीमधील सत्ताधारी शिवसेनेने अर्थसंकल्प चर्चेदरम्यान तो फेटाळून लावला होता. असे असतानाच आता पुन्हा हाच प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी ठेवण्याकरिता प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिका परिवहन प्रशासनाने यंदा ४७६ कोटी १२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पामध्ये जुलै महिन्यानंतर तिकीट दरात २० टक्के वाढीची घोषणा केली होती. या भाडेवाढीतून ९ कोटी ३५ लाख रुपये इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. या प्रस्तावित भाडेवाढीमुळे साध्या बस तिकीट दरात दोन ते १२ रुपये, तर वातानुकूलित बसच्या तिकीट दरात पाच रुपयांनी वाढ होणार होती. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास महागणार होता. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन टीएमटी तिकीट दरात भाडेवाढ लागू होऊ नये यासाठी सत्ताधारी शिवसेनेचे नेते आग्रही होते. तरीही परिवहन प्रशासनाकडून टीएमटी तिकीट भाडेवाढीची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. निवडणुकीच्या तोंडावर अडचणीचा ठरणारा हा प्रस्ताव परिवहन समितीच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेनेने फेटाळून लावला होता. तसेच या भाडेवाढी अपेक्षित धरण्यात आलेले ९ कोटी रुपयांचे उत्पन्न अनुदान स्वरूपात महापालिकेकडून घेण्याची सूचना सदस्यांनी केली. त्यामुळे टीएमटी भाडेवाढ टळल्याची शक्यता वर्तवली जात होती. असे असतानाच टीएमटी भाडेवाढीचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यासाठी परिवहन प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
तिकीटदरांत वाढ करून उत्पन्नवाढीचे प्रयत्न
बेस्ट बसप्रमाणेच तिकीट दर लागू केले तर टीएमटीला वर्षांकाठी सुमारे २५ ते ३० कोटींचा तोटा सहन करावा लागू शकतो आणि भाडेकपात केली नाही तर टीएमटीचे प्रवासी बेस्टच्या स्वस्त प्रवासाकडे वळून उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो, अशी बाब समोर आली होती. त्यामुळे परिवहन प्रशासनापुढे दुहेरी पेच निर्माण झाला होता. अखेर टीएमटी तिकीटदरात वाढ करण्याचा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी ठेवण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.