ठाणे : तुम्ही ठाण्याच्याच आहात का? बरं ‘स्टॉप’ सांगा आणि आधारकार्ड हाताशी ठेवा लवकर…’टीएमटी’ बसमधील तुडुंब गर्दीत वाहकाच्या या सूचनांनी महिला प्रवासी काहीकाळ बुचकळ्यात पडल्या. ठाणे महापालिका प्रशासनाने ‘टीएमटी’ बसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात तिकिट लागू केल्याचे अनेक लाभार्थी महिला प्रवाशांना ठाऊकही नव्हते. त्यात ठाणेकर महिला प्रवाशांना पूर्ण दराचे तिकीट दिल्याने सवलतीच्या दरातील तिकिट योजनेच्या पहिल्या दिवशी प्रवाशांच्या गर्दीत कर्मचाऱ्यांची त्रेधा उडाली.

‘टीएमटी’ बसप्रवासात तिकीट महिलांना ५० टक्के सवलतीत आणि ६० वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास देण्याचा शुभारंभ बुधवारी झाला. सवलतीतील प्रवासात लाभार्थीचे आधार कार्ड बघून तिकीट देण्याच्या सूचना वाहकांना करण्यात आल्या होत्या. परंतु, गर्दीत आधार कार्ड बघून तिकीट देताना वाहकांची तारांबळ उडाली. तिकिटातील सवलत जाहीर झाल्यानंतर तिकिट यंत्रात दर अद्ययावत करण्यात न आल्याने अनेक प्रवाशांना जुन्या दराने तिकिटे देण्यात आली. सवलतीचे तिकीट देताना प्रवाशांचे ओळखपत्र तपासून त्यांनतर तिकीट देताना, अधिकचा वेळ खर्च होत आहे, अशी माहिती एका वाहकाने दिली.

हेही वाचा : “जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात काँग्रेस संपविण्याचे…”, अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा आरोप

शहरातील वागळे इस्टेट, घोडबंदर भागात मोठ्या कंपन्या, लघु उद्योगांची कार्यालये आहेत. याठिकाणी जाण्यासाठी जादाचे रिक्षाभाडे द्यावे लागते. या ठिकाणी काम करणाऱ्या बहुसंख्य प्रवासी पालिकेच्या परिवहन सेवेवर अवलंबून असतात. ठाणे स्थानकात अनेक महिला प्रवासी परिवहनच्या बसचा आधार घेतात.

तयारी आधीच अंमलबजावणी

  • तिकीट सवलत योजनेचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी करण्यात आला. परंतु, ती केवळ ठाणे महापालिका हद्दीतील ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा येथील नागरिकांसाठीच असल्याने हद्दीबाहेरील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
  • या सवलतीबाबत अद्यापही काही ठाण्यातील महिलांना माहीत नाही. त्यात, वाहकांकडून त्यांना या सवलतीबाबत सुरुवातीला सांगितले जात नाही. त्यामुळे त्यांच्याकडून पूर्ण तिकिटाचे पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी काहींनी केल्या.
  • ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या अर्थसंकल्पात ही योजना १ एप्रिल पासून सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, कर्मचाऱ्यांनाही याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तिकीट दराबाबत यंत्रात तसे बदल केले जाणार होते. परंतु, दिलेल्या तारखेच्या आधीच ही सेवा सुरू केल्यामुळे अनेकांना जुन्या दराने तिकिट मिळाली.

हेही वाचा : डोंबिवली नेकणीपाडा येथील बेकायदा बांधकामावर कारवाई करा, पालिकेचे एमआयडीसीला पत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व तिकिटे यंत्रांचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. ही योजना केवळ ठाणेकर नागरिकांसाठी असल्यामुळे त्यांचे ओळखपत्र तपासणे ही वाहकांची जबाबदारी आहे. यासाठी येत्या १५ दिवसात डिजीटल पासची सुविधा उपलब्ध केली जाईल.

भालचंद्र बेहेरे, वाहतूक व्यवस्थापक टीएमटी