ठाणे : दिवा येथील कचराभुमी पाच वर्षांपुर्वी बंद करण्यात आली असली तरी त्याठिकाणी कचऱ्याचे ढिग कायम असून या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून ही जमीन पुर्ववत करण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला होता. या कामाचा कार्यादेश ठेकेदाराला नुकताच देण्यात आल्याने ही जमीन पुर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या जमीनीवर जैवविविधता उद्यान (बायोडायव्हर्सिटी पार्क) उभारण्याचा विचार पालिका प्रशासनाकडून सुरू आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १,०५० टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी १२५ टन कचऱ्यावर विविध प्रकल्पांतर्गत शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती केली जाते. उर्वरित सुमारे ६०० टन ओला कचरा दिवा कचराभूमीवर टाकला जात होता. या कचराभूमीत आग लागण्याचे प्रकार घडत असून या धुरासह दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यातूनच ही कचराभूमी हटविण्याची मागणी होत होती. यासाठी नागरिकांकडून सातत्याने आंदोलने करण्यात येत होती.
कचराभुमीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने ही कचराभुमी बंद करून शहराबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे तात्पुरती कचराभूमी उभारण्यासाठी जागा भाडय़ाने घेतली होती. दोन वर्षांपुर्वी डायघर येथील कचरा विल्हेवाट प्रकल्प सुरू होताच भंडार्ली येथील कचराभुमी बंद करण्यात आली. असे असले तरी, दिवा येथे कचऱ्याचे ढिग कायम आहेत.
कामाचा कार्यादेश दिला
दिवा कचराभुमीवर कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. परंतु त्याठिकाणी यापुर्वी टाकण्यात आलेला कचरा कायम आहे. या कचऱ्याला आग लागून धुर परिसरात पसरतो. याठिकाणी मिथेन वायुचे प्रमाणही अधिक प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे कचराभुमी बंद झाली असली तरी येथील लोकांचा त्रास काही कमी झालेला नाही. ही कचराभुमी बंद केल्यानंतर तेथील कचरा हटवून ती जमीन पुर्ववत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. या कामासाठी पालिकेने प्रस्तावही तयार केला होता. या कामासाठी पालिकेने निविदा प्रक्रीया राबवून ठेकेदाराला कामाचा कार्यादेश नुकताच दिला आहे.
कचराभुमीवर जैवविविधता उद्यान ?
दिवा कचराभुमीवर साठलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. ओला, सुका कचरा आणि माती वेगळी केली जाणार आहे. तसेच येथील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. यानंतर ही जमीन पुर्ववत केली जाणार आहे. यासाठी दिड वषार्चा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या कामासाठी तब्बल ७७ कोटींचा खर्च केला जाणार आहे. याठिकाणी आजच्या घडीला ११ लाख मेट्रीक टन कचरा असल्याचा दावाही पालिकेने केला आहे.
दिड वषार्नंतर ही जमीन पूर्वी जशी होती तशीच मोकळी करुन दिली जाणार आहे. या वृत्तास ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दुजोरा दिला आहे. तसेच ही जमीन खासगी मालकीची आहे. मात्र, त्या जमीनीवर जैवविविधता उद्यान उभारण्याचे आम्ही प्रस्ताव देणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.