ठाणे : शहापूर तालुक्यातील वांद्रे या लहानश्या गावात राहणाऱ्या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी झोळीतून घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा उघड झाला आहे. ग्रामपंचायत वांद्रे हद्दीतील भवरपाडा ते वांद्रे असा एक किलोमीटर रस्ता नसल्याने ग्रामस्थांना महिलेला मुख्य रस्त्यापर्यंत झोळीतून घेऊन जावे लागले. यानंतर मुख्य रस्त्यावरून रुग्णवाहिकेतून महिलेला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने महिलेला वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने महिलेची प्रसूती वेळेत झाली असून महिला आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड हा भाग ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या शहरी भागात प्रशासनाकडून विविध पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. यामुळे शहरातील नागरिकांना हाकेच्या अंतरावर आरोग्य, शिक्षण, वाहतुक यांसारख्या सोयीसुविधा उपलब्ध होत आहे. मात्र याचे पूर्णपणे उलट चित्र हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे.
अपुऱ्या पायाभूत सुविधांची उभारणी, रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात अभाव आणि खिळखिळी झालेली आरोग्य व्यवस्था यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागते. यातील अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे ग्रामस्थांना अनेकदा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले आहे. यामुळे काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे. तर दुसरीकडे तालुक्याच्या रुग्णालयात नेण्यासाठी मुख्य रस्त्यांची गावपाड्याना जोडणीचा नसल्याने रात्री – अपरात्री कोणतीही समस्यां असल्यास तालुक्याच्या ठिकाणी कसे जायचे असा मोठा प्रश्न येथे राहणाऱ्या नागरिकांना पडतो. याचीच प्रचिती अनेकदा येथील ग्रामस्थांना अनेकदा आली आहे.
नेमके झाले काय ?
शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वांद्रे हद्दीतील भवरपाडा येथे एक महिला राहतात. सुमारे ४० ते ५० उंबरठ्यांचा हा पाडा. मात्र गेले अनेक वर्ष भवर पाडा ते वांद्रे या किलोमीटरचा भागात रस्ता बांधून द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र ढिम्म सरकार आणि प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मंगळवारी या महिलेला सायंकाळच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या. यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी आशा सेविकांना संपर्क केला. यावेळी या पाड्यात आशा सेविका दाखल झाल्या. त्यांनी महिलेला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचे सांगितले. मात्र रस्ताच नसल्याने ग्रामस्थांनी महिलेला झोळीतून नेले. यानंतर मुख्य रस्त्यावर आल्यावर रुग्णवाहिकेच्या सहाय्याने त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. आमच्यावर येणारी ही वेळ कधी थांबणार असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे. तर तातडीने या ठिकाणी बांधून द्यावा अशी मागणी वांद्रे सरपंच मारुती साठे यांनी दिली आहे.