ठाणे : गेले काही दिवसांपासून लोकमान्य नगर यशोधन नगर इंदिरानगर या भागातील नागरिकांना सायंकाळच्या वेळी स्थानक परिसरातील गावदेवी भागातून शेअरिंग रिक्षा वेळेत मिळत नसल्याचा चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे या नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. बुधवारी रात्री जवळपास एक तासाहून अधिक काळ नागरिकांना रिक्षाच मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांनी गावदेवी परिसरातील स्थानक परिसराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे अडवित रोष व्यक्त केला. सायंकाळच्या वेळी हा परिसर गजबजलेला असतो त्यात प्रवाशांना रिक्षा मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. परंतु याकडे वाहतूक पोलीस कोणत्याही प्रकारे लक्ष देत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
लोकमान्य नगर इंदिरानगर सावरकर नगर यशोधन नगर या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. त्यामुळे या भागातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक कामानिमित्त स्थानक परिसरात येत असतात. या भागातून ठाणे महापालिकेच्या टीएमटी गाड्या आणि शेअरिंग रिक्षा नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. परंतु टीएमटी गाड्यांची संख्या अपुरी पडत असल्यामुळे अनेक नागरिक शेअरिंग रिक्षावर अवलंबून असतात. गावदेवी परिसरात लोकमान्य नगर शेरिंग रिक्षाचा थांबा आहे. सायंकाळी सात वाजल्यानंतर या भागातील नागरिक या थांब्यावर रिक्षाची वाट पाहत उभे असतात. जस जसा वेळ पुढे जातो तस तशी ही रांग वाढत जाते. परंतु, मागील काही आठवड्यांपासून लोकमान्य नगर थांब्यावर प्रवाशांची भल्ली मोठी रांग लागत आहे. प्रवाशांना अर्धा ते एक तासाच्या अंतराने रिक्षा उपलब्ध होत असल्यामुळे त्यांच्या मधून संताप व्यक्त होत आहे.
बुधवारी रात्री प्रवाशांची इतकी मोठी रांग असतानाही, अनेक रिक्षाचालक लोकमान्य नगर कडे जाण्यासाठी प्रवाशांना नकार देत होते. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी सरळ रस्ता आडवून रिक्षावाल्यांची वाट अडवली. यामुळे गावदेवी परिसरातील स्थानक कडे जाणारा मार्ग पूर्णपणे प्रवाशांनी भरलेला पाहायला मिळाला. या मार्गावरून स्थानक परिसरातील सॅटिस पुलावर टीएमटी बस गाड्या जातात. तसेच इतर खाजगी वाहनांची वाहतूक सुरु असते. प्रवाशांनी ही वाट अडवल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.