ठाणे : उद्वाहकामध्ये मुलाला धक्का दिल्याच्या कारणावरुन भुषण भानुशाली यांनी तीने ते चार जणांना मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात भुषण भानुशाली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वागळे इस्टेट २२ नंबर सर्कल जवळ एक उच्चभ्रु इमारत आहे. या इमारतीत कंपन्या आणि एक हॉटेल आहे. या इमारतीत असलेल्या हॉटेल मालक दिलीप रायचंदानी त्यांचे मित्र अभिजीत पाटील, रितेष शेट्टी, गौरव शेट्टी या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सचिन मिराणी आणि नविन सावला यांच्या कार्यालयात बैठकीसाठी जात असताना, भुषण यांच्या मुलाला चुकून धक्का लागला. या रागामुळे भुषण ४ ते ५ लोकांना घेवून सचिन मिराणी आणि नविन सावला यांच्या कार्यालयात गेले. त्यांच्यापाठोपाठ आणखी ८ ते १० लोक आली. त्यावेळी नविन सावला यांनी भुषण यांना तुम्ही परवानगी शिवाय आतमध्ये कसे आलात अशी विचारणा केली. तर, भुषण आणि त्यांच्यासोबत आलेल्या लोकांनी दिलीप आणि त्यांच्या मित्रांना मारहान करण्यास सुरुवात केली.
तसेच कार्यालयात तोडफोड सुरु केली. या मारहाणीत अभिजीत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध झाले. त्यावेळी भुषण यांनी दिलीप यांना ‘तू रेस्टॉरंटला कसा जातो आणि रेस्टॉरंट कसा चालवतो ते मी पाहतो’ अशी धमकी दिली. याप्रकरणी दिलीप यांनी भूषण विरोधात श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे भूषण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.